डॉ. प्रमोद येवले यांना "प्रा. श्रीवास्तव मेमोरियल अवॉर्ड'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा "प्रा. जी. पी. श्रीवास्तव मेमोरियल अवॉर्ड' या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 20 डिसेंबरला चेन्नई (तमिळनाडू) येथे होणाऱ्या 71 व्या इंडियन फार्मास्युटिकल कॉंग्रेसच्या उद्‌घाटन सभारंभात कुलगुरू यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
"असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया'च्या निवड समितीची बैठक रविवारी (ता. 15) बंगरुळू येथे झाली. या बैठकीत हा पुरस्कार दरवर्षी अखिल भारतीय औषधीनिर्माणशास्त्र शिक्षक संघटनेच्या वतीने (APTI ) औषधीनिर्माण व प्रशासनमध्ये शिक्षण, संशोधन क्षेत्र करणाऱ्या ज्येष्ठ औषधीनिर्माण तंत्रज्ञानांना देण्यात येतो.
प्रा. डॉ. प्रमोद येवले हे गेल्या 37 वर्षांपासून औषधीनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. एक शिस्तप्रिय व उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. वर्धा येथील औषधीनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये 1982 मध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्त झाले. महाविद्यालयामध्ये औषधीनिर्माणशास्त्र विषय पदविकापासून पदवी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी याची सोय त्यांनी या ग्रामीण महाविद्यालयात उपलब्ध करून दिली. महाविद्यालयास राष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळवून दिला. "एनबीए'चे दोनदा "अ' श्रेणीमध्ये मूल्यांकन व पहिल्याच सायकलमध्ये नॅकची "अ' श्रेणी त्यांनी या महाविद्यालयास मिळवून दिली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत असताना त्यांनी परीक्षा पद्धतीमध्ये बराच बदल घडवून आणला. तसेच आचार्य पदवीचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले. शिक्षणक्षेत्रामध्ये या बाबतचा "येवले पॅटर्न' म्हणून प्रसिद्ध आहे. डॉ. येवले यांना यापूर्वीही अनेक विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्थरांवरील पारितोषिकांनी गौरविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार, रा. तु. म. नागपूर विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार, इंडियन सोसायटी ऑफ टेक्‍निकल एज्युकेशन (दिल्ली) यांचा "राजारामबापू पाटील तांत्रिक शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार', ऑल इंडिया फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया या संस्थेचा "उत्कृष्ट प्राचार्य' या पारितोषिकाचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com