डॉ. राजेंद्र भट्टड यांचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

दर्यापूर (अमरावती) : येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक तथा गोदावरी हॉस्पिटलचे संचालक, एकवीरा शैक्षणिक संस्था व गोदावरी चॅरिटेबल ट्रस्ट, गोदावरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मदनगोपाल भट्टड यांच्या संशयास्पद मृत्यूने शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यांच्या मृत्यूने वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ. भट्टड यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्‍याने झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी दुसरीकडे त्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविल्याची चर्चा आहे.

दर्यापूर-अकोट रोडवर असलेल्या त्याच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (ता. पाच) सकाळी नऊ वाजेदरम्यान डॉ. भट्टड यांचा मृतदेह अतिदक्षता कक्षाला लागून असलेल्या खोलीत आढळून आला. या घटनेची वार्ता शहरभर पसरताच खळबळ उडाली. दरम्यान, अनेकांनी त्यांच्या रुग्णालयात धाव घेतल्याने दिवसभर तेथे बघ्यांची गर्दी सुरूच होती. डॉ. भट्टड हे गोदावरी हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्कृष्ट आरोग्यसेवा देणारे म्हणून सुपरिचित होते. एकवीरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा त्यांची भरीव कामगिरी होती. हजारो विषबाधित रुग्णांना उपचारातून जीवनदान दिल्याचे उल्लेखनीय कार्य ते बजावत होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केल्या जात असून त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले व आप्तपरिवार आहे.
बुधवारी (ता. चार) अचानक त्यांनी दर्यापुरात असलेल्या त्यांच्या सर्व मित्रपरिवारात क्षमायाचना करणारा मेसेज व्हॉट्‌सऍपवर पाठविला. त्यात माझ्यामुळे कुणाला कोणताही त्रास अथवा मन दुखावले असल्यास त्याबाबत क्षमायाचना केली. जैन धर्मीयांचा हा क्षमादिन म्हणून असल्याचेही यात म्हटले होते.
दरम्यान, डॉ. भट्टड यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला नसून त्यांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त करीत त्याच्या मृतदेहाचे अमरावतीच्या तज्ज्ञ डॉक्‍टरकडून इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तालुका शिवसेनाप्रमुख गोपाल अरबट, मनसेचे तालुकाध्यक्ष मनोज तायडे व आशीष शिरभाते यांनी पोलिसांना दिले. यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शवविच्छेदनानंतरच याप्रकरणातील नेमके रहस्य उलगडणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Rajendra Bhattad Suicide