ज्ञानाच्या कलेशी नाते सांगणारी ‘बोधी’

केवल जीवनतारे
रविवार, 6 मे 2018

नागपूर - ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार घेऊन बोधी नाट्य परिषद मुंबईत पंधरा वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहे. नाट्यवाचनाच्या कार्यशाळांपासून सुरवात झाल्यानंतर नाट्य कार्यशाळा, नाट्य महोत्सवापासून विविध साहित्यापर्यंतचा प्रवास बोधीच्या माध्यमातून सुरू झाला आहे. तर भविष्याचा वेध घेत आद्य नाट्यकार अश्‍वघोषांच्या कलांसह, बोधी कला संगितीपासून तर बौद्ध राष्ट्रांतील बुद्धकलांशी नाते सांगण्यासाठी बोधीची निर्मिती असल्याचे संयोजक डॉ. सुरेश मेश्राम (मुंबई) म्हणाले. 

नागपूर - ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार घेऊन बोधी नाट्य परिषद मुंबईत पंधरा वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहे. नाट्यवाचनाच्या कार्यशाळांपासून सुरवात झाल्यानंतर नाट्य कार्यशाळा, नाट्य महोत्सवापासून विविध साहित्यापर्यंतचा प्रवास बोधीच्या माध्यमातून सुरू झाला आहे. तर भविष्याचा वेध घेत आद्य नाट्यकार अश्‍वघोषांच्या कलांसह, बोधी कला संगितीपासून तर बौद्ध राष्ट्रांतील बुद्धकलांशी नाते सांगण्यासाठी बोधीची निर्मिती असल्याचे संयोजक डॉ. सुरेश मेश्राम (मुंबई) म्हणाले. 

दलित नाट्य परिषदेचा पुढचा टप्पा म्हणजे बोधी नाट्य परिषद आहे का?
बोधीची संकल्पनाच वेगळी आहे. बोधी हा शब्द थेट तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांकडे घेऊन जातो. बुद्ध एक विचारवंत. त्यांना बोधी अर्थात ज्ञान प्राप्त झाले. अडीच हजार वर्षांपूर्वीची ज्ञानाची परंपरा कलेच्या माध्यमातून अधिक व्यापक व्हावी  या हेतूने बोधीची स्थापना झाली. आपल्याकडे कलेसाठी कला, की जीवनासाठी कला असा समज रुढ झाला आहे, परंतु बोधी ज्ञानासाठी कला हा विचार सांगते. २००३ साली डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ नाट्यकर्मी वामन केंद्रे यांच्या उपस्थित बोधी नाट्य परिषदेची स्थापना झाली. ज्येष्ठ नाट्यलेखक प्रेमांनद गज्वी, अशोक हंडोरेंसह बोधीची वाटचाल सुरू आहे.

ज्ञानासाठी कलेचा बोधीचा विस्तारणारा कॅनव्हास कसा सांगता येईल?     
बोधी विचारात केवळ नाट्यकला हाच विचार अपेक्षित नाही. तर नाट्य कला, स्थापत्यकला, चित्रकला, शिल्पकला, संगीतकला व नृत्यकलेचाही विचार बोधीत आहे. प्रत्येक कलेला स्वतंत्र इतिहास आहे. बोधीच्या निमित्ताने हा कलेचा कॅनव्हास वाढवण्याचा प्रयत्न गेल्या १५ वर्षापासून सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैश्‍विक विचार म्हणजे बोधी संस्कृती. ही संस्कृती निर्माण करण्यासाठी जे जे टप्पे पार करता येतील ते पार करण्याचा प्रयत्न आहे. हाच बोधी परिषदेचाही उद्देश आहे. आजवर ३८ कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. १२५ संहितांचे वाचन झाले. नाटक वाचनासह आता साहित्य प्रकारातील कथा, कविता आणि कादंबरीवर कार्याशाळा घेण्यात येत आहेत. ‘हवे पंख नवे’ ही कादंबरी, परंतु यातून एकपात्री प्रयोग जन्माला आला. यातून आता अनेक पात्र निर्माण करीत नाटक तयार होत आहेत. बोधी कला संगिती हा नवीन प्रकार या नाट्य परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. 

बोधीची भविष्यातील वाटचाल कशी असेल?  
यापुढे देशाचाच नाही तर श्रीलंका, थायलंड, जापान सारख्या बौद्ध राष्ट्रांमधील बुद्ध संस्कृतीच्या संशोधनातून ‘नाट्य’ उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी नाटककार प्रेमांनद गज्वीसंह अशोक हंडोरे व इतर नाट्य लेखकांनी ध्यास घेतला आहे. औरंगाबादसारख्या शहरात पाली भाषेतून नाट्यलेखन सुरू आहे. ही परंपरा देशभर सुरू झाल्यास पाली साहित्य संस्कृतीवर संहिता लेखन करणारे सशक्त नाटककार घडवता येतील. पाच वर्षांपूर्वी अजिंठा येथील लेण्यांच्या संशोधनातून बोधी नाट्य चळवळीच्या दालनात चार नाटक आकाराला आले होते. या नाटकांचे प्रयोग झाले. 

आपण विदर्भाचे असताना येथे बोधी परिषदेचे नजरेत भरणारे काम नाही? 
नाटककार प्रेमानंद गज्वी आणि मी नागपूर जिल्ह्यातील. परंतु राज्याच्या राजधानीत भक्कमपणे बोधी पाय रोवून आहे. मुंबईत दखल घेतली जाते. नागपुरात सांस्कृतिक नाट्य चळवळ आहे. परंतु ती अनेक राहुट्यांमध्ये आहे. या सर्व संस्थांनी स्वतःचे अस्तित्व कायम ठेवून व्यापक विचार करण्याची वेळ आली आहे. नागपुरात बोधी कला संगिती घेण्याचा विचार आहे.
 
आपण या नाट्यचळवळीकडे कसे वळलात? 
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना नीलकांत कुलसुंगे यांच्यासोबतीने ‘रॅगिंग’ एकांकिका पद्‌माकर डावरे एकांकिका स्पर्धेत सादर झाली. तेथूनच नाट्यप्रवास सुरू झाला. मात्र खऱ्या अर्थाने ताराचंद्र खांडेकर, कवी इ. मो. नारनवरे यांच्या ‘मुक्तिवाहिनी’तून वैचारिक जडणघडण झाली. शासकीय दंत महाविद्यालयात अधिष्ठाता पदापर्यंत पोहचल्यानंतरी तथागत बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा वेध घेणाऱ्या व्यापक विचारांनी नाट्यचळवळीत वळलो. 

Web Title: Dr. Suresh Meshram Interview