शंभराव्या नाट्य संमेलनाच्या रंगमंचावर डॉ. जब्बार पटेल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र


नागपूर : संमेलनाची शंभरावी गाठणाऱ्या आगामी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या नावावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. जब्बार पटेल आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या नावाचे अर्ज नाट्य परिषदेला प्राप्त झाले होते. कार्यकारी समितीच्या मुंबई येथे झालेल्या एका बैठकीमध्ये या नावावर चर्चा करण्यात आली.


नाट्य संमेलन शंभरावे असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासूनच नाट्य वर्तुळाला या संमेलनाची विशेष ओढ लागली आहे. नागपूर येथे पार पडलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये पुढील नाट्य संमेलन मोठ्या झोकात व्हायला हवे, अशी इच्छा संमेलनाध्यक्षासह अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे, अध्यक्षपदासाठीसुद्धा या क्षेत्रातील मात्तबर व्यक्तीचाच विचार करण्यात आला. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये, मुलुंड आणि नागपूर येथील नाट्य परिषदेच्या शाखेसह अन्य शाखांनी ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. जब्बार पटेल यांचे आणि पुणे नाशिक, बीड या शाखांनी मोहन जोशी यांचे नाव नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेला सुचविले होते.
वादविवाद, रुसवे-फुगवे टाळत उत्साहामध्ये हे शंभरी गाठणारे संमेलन पार पडावे याकरिता नाट्य परिषद आग्रही आहे. त्यामुळे, अध्यक्षपदाचे नावदेखील एकमताने ठरावे या प्रयत्नात नाट्य परिषदेची कार्यकारी होती.

डॉ. जब्बार पटेल यांचे नाव निश्‍चित करण्यासाठी नाट्य परिषदेने मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली. माझे नाव सुचविणाऱ्या नाट्य संस्था माघार घेण्यासाठी तयार असल्यास मला हा निर्णय मान्य आहे, अशी नम्र प्रतिक्रिया देत मोहन जोशी यांनी नाट्य परिषदेचा हा निर्णय मान्य केला. त्यामुळे, कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये डॉ. जब्बार पटेल याचे नाव एकमताने निश्‍चित करण्यात आले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. डॉ. जब्बार पटेल हे नाट्य व चित्रपट दिग्दर्शक असून गेल्या पन्नास वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर, मोहन जोशी हे नाट्य व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते असून नाट्य परिषदेचे अनेक वर्ष ते अध्यक्षसुद्धा होते.


रविवारी नियामक मंडळाची बैठक
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नाट्य परिषदेची मध्यवर्ती शाखा अर्ज मागविते. या अर्जांपैकी एका अर्जावर विचार विनिमय करीत मध्यवर्ती शाखेची कार्यकारिणी समिती नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये आपले या विषयीचे मत मांडते. त्यानुसार, या विषयावर चर्चा करण्यासाठी रविवारी नियामक मंडळाची बैठक पार पडू शकते. या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.


कोण आहेत डॉ. जब्बार पटेल?
वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले. त्यांचे "अशी पाखरे येती' हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर, "घाशीराम कोतवाल' हे सुप्रसिद्ध नाटक, राजकीय सारिपाटावरचे शह-काटशह मांडणारे "सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारित "जैत रे जैत, मुक्ता, पु. ल. देशपांडेनी लिहिलेला "एक होता विदूषक' असे एकापेक्षा एक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासांच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. सध्या पुण्याच्या एमआयटी विद्यापीठातील नाट्य शाखेचे ते संचालक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com