अजगराने केले हरीणसदृश प्राण्याला गिळंकृत

धामणगावरेल्वे : घटनास्थळी असलेला अजगर.
धामणगावरेल्वे : घटनास्थळी असलेला अजगर.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) :  तालुक्‍यातील जुना धामणगाव येथील शेतशिवारात एका अजगराने हरीणसदृश जनावराला गिळंकृत केल्याची घटना सोमवारी (ता. 12) दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. परंतु वनविभागाचे मदत पथक तब्बल सायंकाळी सात वाजता पोहोचल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, अमरावती येथील वनविभागाच्या जलद कृती दलाने सायंकाळी सात वाजता अजगराला ताब्यात घेऊन वाहनाद्वारे चांदूररेल्वे येथे नेण्यात आले.
गेल्या आठवड्यात सुरू असलेल्या पावसाची संततधार उघडल्याने घरी असलेल्या जनावरांना चारा मिळावा, यासाठी शेतात गेलेल्या जुना धामणगाव येथील भास्कर तायडे या शेतकऱ्याने अंदाजे पंधरा फूट लांबीचा अजगर हा हरीणसदृश जनावराला गिळंकृत करीत असल्याचे शेतकरी पवन शर्मा यांच्या शेतात पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती मजुरांना दिली. त्यामुळे एकच कल्लोळ उडाला. जो तो पाहण्यासाठी शेतात धावू लागला. यात शेतकऱ्याचे तुरीच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेत तब्बल सात तासांनंतर वनविभागाचे पथक आले.
वनविभागाशी संपर्क केला असता दुसऱ्या कुठल्यातरी एका प्रकरणात परतवाडा येथे असल्यामुळे उशीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सायंकाळी 7 वाजता अमरावती येथील वनविभागाच्या जलद कृती दलाने अजगराला ताब्यात घेतले. या दलात अमोल गावनेर, मनोज माहूलकर, सतीश उमप, मनोज ठाकूर, वैभव राऊत, दिनेश वाळके यांचा समावेश होता. कार्स ग्रुपचे सर्पमित्र अशफाक शहा हेदेखील या वेळी हजर होते. या अजगराची चांदूररेल्वे येथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार जंगलात सोडण्यात येणार असल्याचे जलद कृती दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी (ता. 12) दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या अतिसंवेदनशील घटनेत संपूर्ण जमाव घटनास्थळी जाऊन अजगराचा फोटो व सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत होता. या मुळे शेतकरी पवन शर्मा यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. वनविभागाचे पथक तत्काळ पोहोचले असते पिकांचे नुकसान टळू शकले असते.
- पवन शर्मा,
शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com