विदर्भातील नंदनवन चिखलदऱ्याच्या स्कायवॉकचे स्वप्नच राहिले अधुरे, काम सुरू होण्याची पर्यटक, व्यावसायिकांना प्रतीक्षा

चिखलदरा : स्कायवॉकसाठी उभारण्यात आलेला टॉवर.
चिखलदरा : स्कायवॉकसाठी उभारण्यात आलेला टॉवर.

चिखलदरा (जि. अमरावती) : विदर्भच नव्हे तर देशभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या चिखलदऱ्याच्या स्कायवॉकच्या उभारणीला सध्या ब्रेक लागल्याने पर्यटक तसेच स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाच्या सर्वच विभागांनी याविषयावर सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

देशातील पहिल्या व आशियातील तिसरा स्कायवॉक बनविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याची निवड केली. त्यासाठी सिडकोच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्णसुद्धा झाले. आता टॉवरवर केबल टाकून प्लेट बसविण्याचे काम शिल्लक आहे.

परंतु पोलिस वायरलेस सेंटरच्या कम्पाउंडची जागा बाधक ठरत आहे. सुमारे १२ ते १५ चौरस फुटांच्या जागेसाठी गेल्या काही महिन्यांपासून सिडको व पोलिस वायरलेस सेंटर यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटीत काम रखडले आहे.

चिखलदरा येथील हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीवर्धन करंडे, सचिव मनोज शर्मा, हॉटेल व्यावसायिक नीलेश कुळकर्णी, तिलक मिश्रा, वेदांत सुरपाटणे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही समस्या निकाली काढण्याची विनंती केली होती. मात्र, अद्याप कोणताही मार्गा निघाला नसल्याची माहिती आहे.

अवश्य वाचा : वेदना ऐकून मुख्यमंत्रीही झाले निःशब्द; सोनझारी वस्तीत पीडित मातांचे केले सांत्वन

तफावतीचा नवा प्रस्ताव

यासंदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आधी १ कोटी ९३ लाखांचे इस्टिमेट होते. सिडकोने बांधकाम विभागाकडून तयार करून घेतलेले नवे इस्टिमेट २ कोटी १५ लाखांचे आहे. त्यामुळे यातील तफावतीचा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळणार आहे.

पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रोजेक्‍ट
स्कायवॉक हा चिखलदरा पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण प्रोजेक्‍ट आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. जेणेकरून चिखलदऱ्याचा पर्यटन विकास होईल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.
- विजया सोमवंशी, नगराध्यक्ष.


रोजगार उपलब्ध करून देणारा प्रकल्प
स्कायवॉक हा येथील व्यवसाय वाढीसोबतच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, सध्या काम बंद पडल्याने येथील पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. येथील नागरिक, व्यावसायिक तसेच लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष पसरला आहे.
- मनोज शर्मा, सचिव, चिखलदरा हॉटेल ओनर्स असोसिएशन.
 

परवानगी द्यावी
चिखलदऱ्याचा विकास करायचा असेल; तर स्कायवॉक प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे. सर्व विभागांनी याबाबत सकारात्मक राहून परवानगी द्यावी.
- रूपेश चौबे, माजी उपाध्यक्ष.


(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com