जहॉं चार यार मिल जाये वहीं रात हो गुलजार... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवर पाचशे मीटरच्या आत दारूविक्रीवर बंदी घातली. यामुळे मद्यप्रेमींची कोंडी झाली असे वाटत असेल. मात्र, कायद्याला सहजासहजी जुमानतील ते मद्यप्रेमी कसले! त्यांनी आता पोलिस ठाण्यांपासून दोनशे मीटरच्या आतच फुटपाथवर मधुशाला भरविण्यास सुरुवात केली. 

नागपूर - सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवर पाचशे मीटरच्या आत दारूविक्रीवर बंदी घातली. यामुळे मद्यप्रेमींची कोंडी झाली असे वाटत असेल. मात्र, कायद्याला सहजासहजी जुमानतील ते मद्यप्रेमी कसले! त्यांनी आता पोलिस ठाण्यांपासून दोनशे मीटरच्या आतच फुटपाथवर मधुशाला भरविण्यास सुरुवात केली. 

धंतोली, अजनी, यशोधरानगर आणि गिट्टीखदान पोलिस ठाण्याजवळचे फुटपाथ आणि अंधाऱ्या गल्लीतील अंड्यांच्या ठेल्यावर चार-पाच मित्र एकत्र येऊन सर्रास रात्री बार भरवतात. या ठाण्यांजवळ घडलेल्या घटनाच याची याची साक्ष देतात. काही क्षेत्रात झालेल्या बंदीमुळे देशी दारूच्या दुकानांवर सध्या गर्दी वाढली आहे. बिअर शॉपी आणि दारूच्या दुकानांतच बाटल्यांवर बाटल्या रिचवून रस्त्यावर चौकात मद्यपी धिंगाणा घालताना दिसताहेत. मद्यपींना हटकल्यास ते हल्ला करतात. अनेक देशी दारूची दुकाने शहरातील मुख्य चौकात तसेच पोलिस ठाण्याच्या 200 मीटर अंतरावर आहेत. मद्यपी दारू विकत घेऊन चौकातील अंड्याचे ठेले किंवा चकना विक्रीच्या ठेल्यावर येऊन ती पितात. तेथेच त्यांना थंड पाणी आणि खाण्याची सोय करून दिली जाते. हातठेले रात्रीच्या सुमारास खुलेआम दारूचे बार बनतात. मात्र, पोलिस निरीक्षकांना चार्लीकडून "मलिदा' मिळत असल्याने कारवाई होत नाही. रात्रीच्या सुमारास चौकात भाजीपाला किंवा दुकानापर्यंत जाताना महिलांमध्ये भीती असते. मद्यपी शिवीगाळ, मारामारी, शेरेबाजी करताना दिसतात. मात्र, त्यांची तक्रार कोण करणार, असा प्रश्‍न महिलांना पडतो. 

गिट्टीखदान 
दारू पिऊन रस्त्यावर आणि घरासमोर धिंगाणा घालणाऱ्यांना हटकले म्हणून मद्यपींनी एका युवकाची घरासमोरील कार जाळली. ही घटना 15 एप्रिलला गिट्टीखदानमधील भीमटेकडी परिसरात घडली. आतिष बागडे (भीमटेकडी) यांनी रात्रीच्या सुमारास रस्त्यावर दारू पिणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यपींनी त्यांनाच दमदाटी करून हुसकावून लावले. भीतीने बागडे कुटुंबीय घरात गेले. त्यानंतर मद्यपी आतिष बागडे यांची कार पेटवून पळून गेले. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

यशोधरानगर 
यशोधरानगरात राहणाऱ्या एका पत्रकाराने काही मद्यपींना हटकले. त्यामुळे मद्यपींनी बाचाबाची करून शिवीगाळ केली. त्या पत्रकाराने पोलिस निरीक्षक जी. एम. मुजावर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. तेव्हा कुठे दुसऱ्या दिवसापासून रस्त्यावर गस्त वाढविण्यात आली. 

धंतोली 
धंतोलीतील रेल्वे ओव्हर ब्रिजखालील रोडवर सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास तीन तरुण दुचाकीने आले. त्यांनी फुटपाथवरच ठाण मांडले. दारूच्या बाटल्या उघडून फुटपाथवरच रिचवल्या तर दोघे फुटपाथवर पसरले. 

अजनी 
अजनी पोलिस ठाण्याच्या मागच्या गल्लीत चिल्लर देशी दारूचे दुकान आहे. तेथे रात्री आठ वाजतापासून गर्दी असते. तेथून दारू विकत घेतल्यानंतर चौकात बसलेल्या चणे-फुटाणे विकणाऱ्याजवळ खुलेआम प्लास्टिकच्या ग्लासने दारू ढोसतात. पोलिस स्टेशनच्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या दारूच्या गुत्त्याकडे पोलिस फिरकतसुद्धा नाहीत. मात्र, वस्तीतील महिलांनी कितीही तक्रारी केल्या तरी कुणी गांभीर्यसुद्धा दाखवत नाही. 

Web Title: Drinker issue