औरंगाबादमधून चालकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

नागपूर - मालकाकडे इमानेइतबारे काम करणाऱ्या कारचालकाची ७० लाखांची रक्‍कम बघून नियत बिघडली. त्याने मालकाशी दगाबाजी करीत रक्‍कम घेऊन कुटुंबासह नागपुरातून पळ काढला. मात्र, गणेशपेठ पोलिसांनी त्याचा पाठलाग करून औरंगाबादमधून अटक केली. नीलेश अशोक पखाले (वय ३१, कृष्णानगर, खरबी) असे आरोपी चालकाचे नाव आहे. गणेशपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मारोतराव उपरे (वय ३७, गोदरेज आनंदम सिटी, गणेशपेठ) यांची स्वामी फ्युअल्स नावाने कंपनी आहे. दर महिन्याला जवळपास पाच ते सहा कोटी रुपयांच्या कोळशाची खरेदी-विक्री करतात. त्यांच्या कारवर चालक नीलेश ३ वर्षांपासून होता.

नागपूर - मालकाकडे इमानेइतबारे काम करणाऱ्या कारचालकाची ७० लाखांची रक्‍कम बघून नियत बिघडली. त्याने मालकाशी दगाबाजी करीत रक्‍कम घेऊन कुटुंबासह नागपुरातून पळ काढला. मात्र, गणेशपेठ पोलिसांनी त्याचा पाठलाग करून औरंगाबादमधून अटक केली. नीलेश अशोक पखाले (वय ३१, कृष्णानगर, खरबी) असे आरोपी चालकाचे नाव आहे. गणेशपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मारोतराव उपरे (वय ३७, गोदरेज आनंदम सिटी, गणेशपेठ) यांची स्वामी फ्युअल्स नावाने कंपनी आहे. दर महिन्याला जवळपास पाच ते सहा कोटी रुपयांच्या कोळशाची खरेदी-विक्री करतात. त्यांच्या कारवर चालक नीलेश ३ वर्षांपासून होता. तो अनेक वेळा कारमधील पेट्रोल-डिजेल किंवा काही वस्तू चोरून विकत होता. शुक्रवारी नितीन उपरे यांच्या मित्रांनी दिलेले ७० लाख रुपये घरी पोहोचविण्याची जबाबदारी दिली होती. त्याने पैशाने भरलेली बॅग घेतली आणि स्वतःच्या दुचाकीने पैसे घेऊन घरी आला. पत्नी, साळी आणि दोन मुलींना लगेच तयारी करण्यास सांगितले. त्यांनी स्कॉर्पियो भाड्याने घेतली आणि थेट अमरावती गाठले. तेथे रात्रीच्या सुमारास श्रीपाद हॉटेलमध्ये पाचही जण थांबले. सकाळ होताच ते सर्व शिवशाही बसने औरंगाबादला रवाना झाले.

दुसरीकडे नितीन उपरे यांनी गणेशपेठमध्ये चालकाने ७० लाख रुपये लांबविल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक अमित आत्राम यांचे पथक अमरावतीला रवाना झाले. लॉज-हॉटेलमधून माहिती घेत असता आरोपी औरंगाबादकडे गेल्याचे कळले. पोलिसांनीही औरंगाबादकडे कूच केली. नीलेश हा कुटुंबासह औरंगाबादला पोहोचला. त्याने तेथे उबेर कार भाड्याने घेत जालन्याकडे निघाला. जालना-औरंगाबाद मार्गावर असलेल्या दुसरबीड येथील एका ढाब्यावर त्यांनी जेवण केले आणि निघून गेले. काही वेळातच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी लगेच पाठलाग करीत आरोपीला रस्त्यातच गाठले. त्या सर्वांना ताब्यात घेऊन नागपुरात आणले. त्याच्याकडून ७० लाख रुपये जप्त करण्यात आले.

सायबर सेलची मदत
नीलेश पळून गेला होता. त्याने अमरावतीमध्ये नवीन मोबाईल घेतला, तर एक ट्रॅव्हलिंग बॅग घेतली. पत्नी व साळीकडे मोबाईल होता. त्यामुळे ते मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध सायबर क्राइमच्या माध्यमातून घेत होते. सायबर क्राइमच्या मदतीमुळेच पकडण्यात यश आल्याची माहिती आहे.

Web Title: driver arrested in theft case