ड्रायव्हरने केले 7 लाखांचे पेट्रोल लंपास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील झोन चौकात मुरली ऍग्रो कंपनी आहे. येथे आरोपी दुबे वाहनचालक म्हणून कामावर होता. पेट्रोल पंपाच्या संचालकांसोबत असलेल्या करारानुसार, कंपनीच्या वाहनात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रोख रकमेऐवजी व्हाउचर द्यावे लागत होते. ते ध्यानात आल्यामुळे दुबे याने कंपनीचे एक व्हाउचर बुक चोरले. त्याआधारे त्याने 1 सप्टेंबर 2019 ते 4 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत तब्बल 6,400 लिटर डिझेल हिंगणा नाक्‍यावरील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरून भरून घेतले. तो रोज 200 ते 400 लिटर इंधन भरायचा. दुबे आणि साथीदारांची बनवाबनवी लक्षात आल्यानंतर कंपनी प्रशासनाने त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सात लाख 14 हजारांचे इंधन उचलणारा दुबे विचारपूस करताच गायब झाल्याने कंपनीतर्फे राहुल नामदेव बोरकर (वय 28) यांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीअंती हवालदार विजय नेमाडे यांनी बुधवारी आरोपी दुबेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
मुख्य आरोपी दुबे मूळचा गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. त्याची बनवाबनवी 7 ऑक्‍टोबरला कंपनीतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्याला यासंबंधाने त्या दिवशी विचारपूस करण्यात आली. आपले बिंग फुटणार याची कल्पना येताच दुबेने कामावर येणे बंद केले. तो त्याच्या मूळगावी, उत्तर प्रदेशमध्ये पळून गेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: driver petrol