भरउन्हाळ्यात अनुभवा "रिमझिम' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नागपूर - उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर सूक्ष्म फवारे (मिस्टिंग) लावण्यात आले आहे. त्याद्वारे भरउन्हाच्यावेळी पाण्याचा रिमझिम वर्षाव होऊन परिसरात गारवा निर्माण होईल. म्हणजेच भरउन्हाळ्यात प्रवाशांना गारवासुद्धा मिळणार आहे. 

नागपूर - उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर सूक्ष्म फवारे (मिस्टिंग) लावण्यात आले आहे. त्याद्वारे भरउन्हाच्यावेळी पाण्याचा रिमझिम वर्षाव होऊन परिसरात गारवा निर्माण होईल. म्हणजेच भरउन्हाळ्यात प्रवाशांना गारवासुद्धा मिळणार आहे. 

दर उन्हाळ्यात नागपूरचे तापमान 47 अंशांचा टप्पा ओलांडते. उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांचा बचाव होण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येतात. यातून बोध घेत मध्य रेल्वेनेसुद्धा प्रवाशांचा उष्म्यापासून बचाव करण्यासाठी फारच "कुल' पद्धती स्वीकारली आहे. पाण्याच्या बचावासाठी शेतात तुषार सिंचन पद्धती अवलंबली जाते. त्याच धरतीवर मिस्टिंग ही पद्धती आधारित आहे. सुमारे 20 फूट उंचीवर पाइप लावून ठरावीक अंतरावर जेटमधून पाण्याचे फवारे उडविण्यात येतात. तुषार जमिनीवर येऊपर्यंत वाफ होते. यामुळे वातावरण आल्हाददायी होते; पण परिसर ओला होत नाही. यापद्धतीद्वारे परिसरातील तापमानात सुमारे 5 ते 6 अंशाने घट आणता येऊ शकते. 

मध्य रेल्वेकडून नागपूर विभागात प्रथमच प्रयोग नागपूर स्थानकावर हा प्रयोग करण्यात येत आहे. सामान्य प्रतीक्षालय आणि फलाट क्रमांक 1, 2 व 3 वर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याची चाचपणीही सुरू करण्यात आली आहे. पाण्याचे तुषार उडत असल्याने भरउन्हाच्यावेळीही वातावरणात गारवा जाणवतो. उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर हे तुषार दिवसभर सुरू ठेवले जातील. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील हा पहिलाच प्रयोग असला तरी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया स्थानकावर यापूर्वीच हा प्रयोग केला असून, त्याला प्रवाशांकडून पसंतीची पावती मिळाली आहे. 

दररोज लागणार 4 हजार लिटर पाणी 
सुमारे 12 लाख रुपये खर्च करून नागपूर स्थानकावर मिस्ट कुलिंग यंत्रणा उभारण्यात आली आहे. दिवसभर पाण्याचे तुषार उडविण्यासाठी दररोज 4 हजार लिटर पाण्याची गरज भासणार आहे. रेल्वेचा जलशुद्धीकरण प्रकल्प असला तरी मिस्ट कुलिंगसाठी महापालिकेद्वारे पुरविण्यात येणारे पाणीच वापरण्यात येणार आहे. 

उन्हाच्या तडाख्यापासून प्रवाशांचा बचाव होण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा प्रथमच फलाट क्रमांक 1,2 व 3 सह सामान्य प्रतीक्षालयात ही व्यवस्था करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे भरउन्हाळ्यात प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. 
- प्रवीण पाटील जनसंपर्क अधिकारी, नागपूर विभाग, मध्य रेल्वे. 

Web Title: Drizzle over the summer experience