यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; प्रशासनाकडून दुष्काळावर शिक्कामोर्तब; अंतिम पैसेवारी 46

चेतन देशमुख 
Thursday, 31 December 2020

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करीत असतानाच महसूल विभागाने पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत केली. गेल्या 30 सप्टेंबरला जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जाहीर झाली. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले

यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम 46 पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब केले आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करीत असतानाच महसूल विभागाने पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत केली. गेल्या 30 सप्टेंबरला जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी जाहीर झाली. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले, असे असले तरी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी 65 आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. सुधारित काही प्रमाणात नुकसान दिसून आले होते. मात्र, पैसेवारी 50च्यावर होती. अंतिम पैसेवारीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा  -चंद्रपुरातील घुग्गुसचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार; नगर परिषद स्थापन करण्याची मागणी;...

गेल्या वर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी नजरअंदाज पैसेवारी 60च्यावर होती. मात्र, अंतिम पैसेवारीत सुधारणा झाली. यंदाही जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांत पावसाचा फटका पिकांना बसला. असे असले तरी नजरअंदाज पैसेवारी 65 निघाल्याने पीकपरिस्थिती उत्तम असल्याचे प्रशासनाच्या लेखी दिसत होते. सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. 

शेतकऱ्यांना मदतीसाठी अंतिम पैसेवारी महत्वाची आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने पिकांना फटका बसला. गेल्या वर्षी पीक काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने आगमन झाल्याने शेतातील पीक अडचणीत सापडले होते. सप्टेंबरमधील पावसाने लवकर पेरणी केलेल्या पिकांना मोठा फटका बसला. सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली. कपाशीला फटका बसला. परिणामी शेतकऱ्यांची एकरी उत्पादनात घट झाली. अशातच जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 46 आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा - नागपुरातून शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी होणार; अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची घोषणा

सुधारित पैसेवारीवरच बहुतांशवेळी अंतिम पैसेवारी असते. त्यात फारसा बदल होत नाही. यावेळी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे होते. त्यामुळेच सुधारित व अंतिम पैसेवारीत मोठा बदल झाला. जिल्ह्यात दोन हजार 159 गावे आहेत. त्यात लागवडीसाठी योग्य असलेल्या गावांची संख्या दोन हजार 46 एवढी आहे. या सर्व गावांची पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्याची अंतिम सरासरी 46 पैसेवारी आली आहे.

संपदान - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought declared in yavatmal district Vidarbha news