9710 शेतकरी दुष्काळाच्या कात्रीत

अजय धर्मपुरीवार
शनिवार, 11 मे 2019

हिंगणा (नागपूर) : तालुक्‍यात तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. सरकारने दोन महसूल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले असून, चार महसूल मंडळ वाऱ्यावर सोडले. यामुळे तालुक्‍यातील 9,710 शेतकरी दुष्काळाच्या कात्रीत सापडले आहेत. परिणामी कापूस व तूर उत्पादक संकटात आला आहे.

हिंगणा (नागपूर) : तालुक्‍यात तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. सरकारने दोन महसूल मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केले असून, चार महसूल मंडळ वाऱ्यावर सोडले. यामुळे तालुक्‍यातील 9,710 शेतकरी दुष्काळाच्या कात्रीत सापडले आहेत. परिणामी कापूस व तूर उत्पादक संकटात आला आहे.
हिंगणा तालुक्‍यात गुमगाव, हिंगणा, वानाडोंगरी, कान्होलीबारा, अडेगाव व टाकळघाट या सहा महसूल मंडळांचा समावेश आहे. येथे मुख्यत्वे कापूस, सोयाबीन व तुरीचे उत्पादन घेतले जाते. तालुक्‍यात 17,072 शेतकरी आहेत. खरीप हंगामात कापसाचे पीक शेतकऱ्यांनी लावले. या पिकावर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. सोयाबीन पिकाचे उत्पादनही घटले. मागील वर्षीपेक्षा यंदा तुरीचे उत्पादन तालुक्‍यात कमी झाले आहे. यामुळे तालुक्‍यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थिती सहाही महसूल मंडळांत असताना सरकारने दोनच महसूल मंडळ दुष्काळग्रस्त असल्याची नोंद केली. यात टाकळघाट व अडेगाव महसूल मंडळाचा समावेश आहे. सरकारच्या कृषी विभागाने तालुक्‍यातील सरासरीपेक्षा 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडलेल्या महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त घोषित केले. सरकारचा हा नियमच शेतकऱ्यांना घातक ठरला आहे.
हिंगणा, वानाडोंगरी, गुमगाव व कान्होलीबारा या चार मंडळात पाऊस 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाला असला तरी दुष्काळाची स्थिती दिसून येत आहे. सरकारने परिस्थितीचे अवलोकन न करता या महसूल मंडळांना दुष्काळातून वगळल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. तालुका कृषी कार्यालय, पंचायत समिती कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून उर्वरित चार महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे.
40 दिवस पावसाची हजेरी
पावसाळ्यात 52 ते 55 दिवस पावसाचे असतात. 2018 मध्ये केवळ 40 दिवस पाऊस पडला. 13 दिवस पावसाने हुलकावणी दिली. केवळ सहा जुलैला 223 मि.मी. पाऊस पडला. यामुळे एकाच दिवशी पडलेला पाऊस वाहून गेला व पाणीसाठा मुबलक उपलब्ध झाला नाही. तालुक्‍याची पावसाची सरासरी 1043.50 मि.मी. आहे. पाऊस पडण्याचे दिवस दरवर्षी कमी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे.
सन 2018 मधील पावसाची स्थिती
मंडळ आकडेवारी
हिंगणा 893.02 मि.मी.
गुमगाव 773.09 मि.मी.
कान्होलीबारा 813.68 मि.मी.
वानाडोंगरी 893.02 मि..मी.
अडेगाव 589.10 मि.मी.
टाकळघाट 723.10 मि.मी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drought news