राजकारण करू नका भाऊ, हा दुष्काळ आहे....

Drought
Drought

नागपूर - जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा तालुका म्हणून काटोलची ओळख आहे.  राजकीय असो किंवा सांस्कृतिक काटोलने सर्वच बाबतीत आघाडी कायम ठेवली आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला अन्‌ यातही काटोलचा समावेश झाला. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत्रा बेल्टमधील काटोल तालुक्‍यात यंदाचे साल अवकर्षणाचे ठरले आहे. सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्याने पिके नष्ट होत आहेत, जलसाठे कोरडे पडले आहेत. पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडलेले वन्यप्राणी पिकांची नासधूस करीत आहे. यावर्षी शेतीतून काहीच हाती  लागणार नाही, जनावरांसमोर पाण्याचे अन्‌ चाऱ्याचे संकट उभे राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे विकणे व अन्य कामधंदा शोधण्यास सुरुवात केली नाही. यावर्षीसारखी परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 

वन्यप्राण्यांचा पिकांना धोका
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच कमी पाऊस झाल्याने वन्यप्राण्यांचा धोका शेतकऱ्यांना जाणवू लागला आहे. कोंढाळी, मेटपांजरा, कचारी सावंगा या जिल्हा परिषद सर्कलमध्ये वन्यप्राणी शेतकऱ्यांचे उरले सुरलेले पीक नष्ट करीत आहेत. यंदा हवामान खात्याने काटोल तालुक्‍यात ९० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, प्रत्यक्षात ५० टक्केच पाऊस झाल्याने पिके  धोक्‍यात आली. सिंचन करून ती जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. यंदा केवळ पिकाचा उतारा २० टक्‍क्‍यापर्यंत राहणार आहे. पाण्याच्या व अन्नाच्या शोधात जंगलातून बाहेर पडलेल्या वन्यप्राण्यांपासूनही पिकांचे रक्षण करण्यासाठी जागलीवर जावे लागत आहे. वाघाची भीती शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. 

तालुक्‍यातील प्रत्येक गावातील पिकांची स्थिती व सोबतच पाण्याच्या पातळीचे सर्वेक्षण सुरू  आहे. १८ ते २० गावांचा अहवाल तहसीदारांकडे सादर केला आहे. प्रत्यक्ष पाहणीतून पिकांची व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर असून रब्बी पीक पेरणी होणार नाही. यामुळे लगेच उपाययोजना करण्यास सुरुवात करावी लागेल.
- सुरेश कन्नाके, तालुका कृषी अधिकारी 

यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यंत कमी असल्याने जलसंकटासह अनेक समस्या उद्‌भवणार आहेत. यावर मात करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत, जनजागृती व पाण्याची काटकसर हा सर्वांत महत्त्वाचा ठरेल. -सुनील साने, खंडविकास अधिकारी, काटोल.

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला, पण उपाययोजना वेळीच न केल्यास शेतकरी मोठ्या संकटात सापडू शकतो. यातून तो सावरू शकणार नाही. चारा व बियाणे वाटपाने भागणार नाही. भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना राबवावी लागेल. तहान लागल्यावर विहीर न खोदता आतापासून नियोजन केले तर संत्रा फळबागा वाचविता येतील. 
- तारकेश्‍वर (बाबा) शेळके, सभापती बाजार समिती, काटोल

...तर संत्रा नामशेष
काटोल तालुक्‍यात संत्रा व मोसंबी उत्पादकांची बिकट अवस्था आहे. पावसाच्या अनियमिततेचा संत्र्याला मोठा फटका बसला आहे. संत्र्यावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. सरकारकडून यावर्षी अनुदानही मिळाले नाही. खतही महागले, सरकारची ‘बांधावर खत’ योजना बारगळली. संत्रा प्रक्रिया उद्योग बंदच आहेत. हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा काढूनही विम्याची मदत मिळाली नाही. अशा  परिस्थितीत अडकलेला संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. अनेकांनी यावर्षी लावलेल्या संत्रा बागा वाळल्या आहेत. वीजपुरवठा नियमित होत नसल्याने सिंचनही होत नाही. यंदा संत्रा बागा जगल्या नाही तर पुढील पाच वर्षे काटोल तालुक्‍यातून संत्रा नामशेष होईल अशी परिस्थिती असल्याचे मत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. 

बाजार समितीमध्ये संत्र्याची आवक कमी
नागपूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या काटोलच्या बाजारात मंदी आहे. संत्रा, सोयाबीन व अन्य मालाचे यार्ड ओस पडले आहेत. मजूर बाजारात रोजगाराच्या शोधात येतात व रित्या हाताने परत जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 
नागपूर, वरूड पाठोपाठ सर्वांत मोठी संत्रा मंडी म्हणून काटोलची ओळख आहे. नरखेड, काटोल, कळमेश्‍वर मध्य प्रदेशातील पांढुर्णा, सौंसर या तालुक्‍यातून संत्रा विक्रीसाठी काटोलच्या बाजार समितीच्या आवारात पोचतो. दिवाळीच्या काळात फळछाटणी व मालाच्या वाहनासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेली गारपीट, वर्षभर वातावरणातील चढउतार व सरसरीच्या निम्मा पाऊस यामुळे संत्रा व मोसंबीच्या बागांमध्ये उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बाजार समितीच्या यार्डात संत्र्याची आवक आहे. मात्र, कधीकाळी बाजार समितीच्या सर्व यार्डात आंबिया संत्र्याची खरेदी-विक्री व्हायची. यावर्षी संत्र्याचे मुख्ययार्डच  भरले नाही. याचा थेट परिणाम खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या रोजगारावर पडलेला आहे. अनेक मजूर बाजार समितीत दररोज येतात. काम नसल्याचे पाहून पुन्हा रिकाम्या हाताने  परत जात आहेत. संत्र्याची छाटणी करणाऱ्यांना यावर्षी काहीच हाती लागलेले नाही. बाजार समितीमध्ये तालुक्‍यातून सोयाबीनची आवक अत्यल्प आहे. जो माल बाजार समितीमध्ये आला तो सर्व परराज्यातून आला आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना बाजार समिती राबविते,  मात्र यंदा या योजनाचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्‍यता फार कमी असल्याचे मत व्यापारी व बाजार समितीचे संचालक व्यक्त करीत आहेत.

दृष्टिक्षेपात काटोल तालुका
सरासरी पाऊस - ८२७.० मिमी 
पडलेला पाऊस - ५५३.० मिमी 
टक्केवारी - ६३.५ मिमी 

पीकनिहाय क्षेत्र
 लागवडी क्षेत्र - ५१, ८३२ हेक्‍टर 
 प्रत्यक्ष पेरणी - ४९,८१४ हेक्‍टर 
 नुकसान क्षेत्र - ४७,८२१ हेक्‍टर 
 ३३ ते ५० टक्के नुकसान : ११,४५८ हेक्‍टर 
 ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान : ३६,३६३ हेक्‍टर 

शेतकऱ्यांच्या मागण्या 
 सरसरकट कर्जमाफी
 एकरी ५० हजारांची मदत 
 सिंचनासाठी पूर्ण अनुदान
  फळबागांसाठी विशेष योजना राबवावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com