'बुलडाणा जिल्हा पूर्णत: होणार दुष्काळग्रस्त'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ प्रतिसाद
​आमदार डॉ. संजय कुटे यांनी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर सदर निवेदनावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन मंत्री यांना पीक कापणी प्रयोगाची आणेवारी 45 टक्क्याच्या आत आल्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा असे आदेश दिले आहे. त्यामुळे आता संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होणार आहे.

बुलडाणा : गेल्या काही वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण झपाट्याने घटत असून, यंदा प्रमाणापेक्षा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्याच जिल्ह्याची पैसेवारी ही केवळ 46 इतकी आली असल्यामुळे दुष्काळाची झळ किती भयावह यांची प्रचिती येत आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधत परिस्थितीबाबत संपूर्ण माहिती अवगत करून सांगत बुलडाणा जिल्हा पूर्णत: दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी आमदार डॉ. संजय कुटे यांनी आज (ता.20) प्रत्यक्ष भेट देऊन केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांना आदेश दिले आहे. यामुळे बुलडाणा जिल्हा पूर्णत: दुष्काळग्रस्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव जामोदचे भाजप आमदार डॉ. संजय कुटे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बुलडाणा जिल्हा संपूर्णतः: दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत चर्चा केली व सविस्तर निवेदन दिले. त्या निवेदनात त्यांनी नमूद केले होते की, बुलडाणा जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दोन पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. जलयुक्त शिवाराची मोठ्या प्रमाणात कामे झाले. परंतु, पावसाचे प्रमाण कमी झाले व खंड मोठा पडला व परतीचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे तलावांमध्ये सुद्धा अतिशय कमी पाणीसाठा आहे.

जलयुक्त शिवाराच्या कामांमध्ये सध्या पाणी नाही व भूजल पातळी खाली गेलेली आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट हे भीषण आहे. संपूर्ण जिल्ह्याची आणेवारी 45 पैसे आहे. यापूर्वीही 90 महसूल मंडळांपैकी 73 महसूल मंडळे हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. उर्वरित 17 महसूल मंडळांवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे.  17 ही महसूल मंडळामध्ये आणेवारी सुद्धा 45 पैसे यामध्येच आहे व दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तरी प्राप्त झालेल्या आणेवारीनुसार व एकंदरीत परिस्थिती पाहता उर्वरित 17 मंडळांमध्ये सुद्धा दुष्काळ घोषित करण्यात यावा व संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याला न्याय द्यावा अशी संजय कुटे यांनी विनंती केली आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ प्रतिसाद
आमदार डॉ. संजय कुटे यांनी संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर सदर निवेदनावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन मंत्री यांना पीक कापणी प्रयोगाची आणेवारी 45 टक्क्याच्या आत आल्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा असे आदेश दिले आहे. त्यामुळे आता संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होणार आहे.

Web Title: drought situation in Buldhana