ड्रग्ज माफिया आबूला फिल्मीस्टाइलने अटक

नागपूर - ड्रग्ज तस्कर आबू खानला अटक करताना गुन्हे शाखेचे पथक.
नागपूर - ड्रग्ज तस्कर आबू खानला अटक करताना गुन्हे शाखेचे पथक.

नागपूर - विदर्भातील सर्वांत मोठा ड्रग्ज माफिया आबू ऊर्फ फिरोज खानला गुन्हे शाखेने भरवस्तीतून फिल्मीस्टाइलने अटक केली. पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात असताना पाठलाग करून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ४५ हजार रुपयांचा मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आला. आबूच्या अटकेमुळे ड्रग्ज तस्करीत गुंतलेले मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे.

गोवा व मुंबईतील ड्रग्ज माफियांचा ‘खास’ माणूस म्हणून आबू ऊर्फ फिरोज खान अजीत खान (रा. आझादनगर, मोठा ताजबाग) याची ओळख आहे. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून ड्रग्ज तस्करी आणि अन्य अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीशी जुळलेल्या टोळीमध्ये सदस्य म्हणून आबू सामील झाला होता. १० वर्षांत आबू कोट्यवधींचा मालक झाला असून, त्याच्या हाताखाली गुन्हेगारी जगतातील अनेक गॅंग काम करतात.

दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने अमिर खान
 आतिक खान (२८, रा. मुंबई), मोहम्मद वकार ऊर्फ गौस मोहम्मद अनीस (२५, रा. गायत्री प्लाझा), जावेद ऊर्फ बच्चा अत्ताऊल्ला खान (२५, रा. मोठा ताजबाग) व अरशद अहमद अशफाक अहमद (२१) या चौघांना चार लाखांच्या ड्रग्जसह अटक केली होती. गुन्हे शाखेच्या तपासात आबूचा ‘राइट हॅण्ड’ असलेल्या बच्चा खानने आबूच्या धंद्यांची इत्थंभूत माहिती दिली. त्यावरून मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांच्या पथकाने मोठा ताजबाग वस्तीत छापा घातला व त्याला अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडून १५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले. २३ डिसेंबरला अमिर खान व मोहम्मद वकार यांना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल राहुल डिलक्‍स जवळून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७० ग्रॅम ड्रग्ज जप्त केली होती. त्यांच्याकडून एकूण तीन लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ते मोठा ताजबाग येथील बच्चाला ड्रग्जचा पुरवठा करणार होते. त्या आधारावर पोलिसांनी दुसरा सापळा रचला व जावेद ऊर्फ बच्चा व अरशद अहमद यांना ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक लाख ७७ हजारांचे ५९ ग्रॅम ड्रग्ज सापडले होते.

राजकीय वर्तुळातून ‘फिल्डिंग’?
ताजबाग वस्तील ‘दाता’ मानल्या जाणारा आबूवर गेल्या २०१० मध्ये गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तो सर्व कामे पंटरकडून करून घेत होता. कोट्यवधीमध्ये खेळणाऱ्या आबूचे जवळपास २०० समर्थक गुन्हे शाखेजवळ जमले होते. आबूवर कारवाई होऊ नये म्हणून राजकीय वर्तुळातूनही ‘फिल्डिंग’ लावण्यात आली असून महागड्या अलिशान कारमधून अनेक जण गुन्हे शाखेच्या चकरा मारत असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com