...अन् नशेत तरर्र चालक झाला फरार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

-अर्ध्यावरच सोडली खासगी लक्झरी बस
-सुलतानपूर जवळ प्रवाशांचा संताप
-पुण्याला जाण्याऱ्या प्रवाश्यांची झाली गैरसोय

सुलतानपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत आरामदायी आणि सोईस्कर प्रवास मिळण्यासाठी अनेक प्रवाशांची गर्दीच्या हंगामात खासगी लक्झरी बसने प्रवास करण्याकडे कल राहतो. परंतु, हाच प्रवास किती क्लेशदायक आणि संताप आणणारा होऊ शकतो याचा प्रत्यय लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे 12 नोव्हेंबरच्या रात्री प्रवाशांना आला. नशेत तर्रर असलेल्या खासगी लक्झरी चालकाने चक्क ताब्यातील बस सोडून तेथून पळ काढण्याचा प्रकार घडला.

लोणार तालुक्यातील सुलतानपूर मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन अनेक लांब पल्ल्याच्या खासगी लक्झरी बस नागपूरहून पुणे, मुंबई दरम्यान धावत मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करीत असतात. मात्र, या बसच्या चालकांवर कुणाचाच अंकुश नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथून पुण्याकडे निघालेली एमएच 37 बी 6969 क्रमांकाची खासगी ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने निघाली. 

रस्त्यात अनेकवेळा हेलकावे घेत रात्री 10.30 वाजेदरम्यान सुलतानपूर नजीक पोहोचली. यावेळी लक्झरी बसचा चालक दारूच्या नशेत तर्रर असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्याने त्यांच्यात एकच गोंधळ निर्माण झाला. रिसोड येथून खंडेराय ट्रॅव्हल ही खासगी बस अंदाजे 35 ते 40 प्रवासी घेऊन पुण्याकडे जात होती. सुलतानपूर येथे या बसचा चालक दारूच्या नशेत तर्रर असल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांनी विचारपूस केली असता तळीराम चालकाच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते. तोंडातून दारू प्रचंड वास यावेळी उपस्थितांना येत होता. 

दरम्यान, प्रवाशांचा प्रचंड राग बघता आपली खैर नाही हे लक्षात आल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तळीराम चालक बस सोडून फरार झाला. पुण्याकडे दिवाळीची सुट्टी ओटापून निघालेल्या वृद्ध, लहान मुलांबाळासह महिला प्रवाशांना रस्त्याच्या कडेलाच गैरसोयीचा सामना करावा लागला. मार्गाची दयनीय अवस्था व अशातच अशा तळीराम चालक त्यामुळे सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून सुलतानपूर पर्यंत पोहोचल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला.

स्थानिकांनी केली गर्दी
रस्त्याने प्रवासादरम्यान सुसाट वेगाने नियंत्रणाबाहेर जाण्याच्या परिस्थितीत बसमधून प्रवाशांनी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागल्याने त्यांचा राग अनावर झाला. त्यामुळे प्रवासी वाहकांवरही संताप व्यक्त करत होते. बस थांब्यावरील हा वाद बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. 

आरटीओंचे सातत्याने दुर्लक्ष
बुलडाणा जिल्ह्यातील विविध मार्गावर दररोज शेकडो खासगी ट्रॅव्हर्ल्स धावत असतात. त्यांची कोणत्याही प्रकारची तपासणी, चालकाने व्यसन केल आहे का? तसेच इंधन म्हणून काय वापर करण्यात येत आहे. याबाबत आरटीओ विभागाकडून कोणत्याही प्रकारची तपासणी होत नाही. अनेकदा सदर बसेसचे नियमबाह्य लाइट लावल्यामुळे समोरील वाहनधारकाला अडथळा निर्माण होऊन अपघातही होत असल्याचे समोर आले आहे. ऐरव्ही नियमांची अंमलबजावणी करताना खासगी बसेसच्या संदर्भात मवाळ भूमिकेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drunk driver absconded