कोरडे पडलेले नदी-नाले "ओव्हरफ्लो'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी पुन्हा जोम धरला. नरखेड, काटोल तालुक्‍यांत बुधवारी दमदार पावसानंतर गुरुवारी जिल्हाभर पावसाने दमदार बरसण्याला सुरुवात केली. या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्‍त केल्या.

नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी पुन्हा जोम धरला. नरखेड, काटोल तालुक्‍यांत बुधवारी दमदार पावसानंतर गुरुवारी जिल्हाभर पावसाने दमदार बरसण्याला सुरुवात केली. या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्‍त केल्या.
मेटपांजरा : गंभीर परिस्थितीतून मार्ग काढत शेतकऱ्यांनी नव्या जोमाने यंदा पेरणी केली. जून, जुलै कोरडा गेल्याने सुरुवातीची पिके हातून गेली असली तरी न खचता दुबार पेरणी केली. जुलैत पडलेल्या सरींनी पिकांना नवसंजीवनी दिली असली, तरी नदी, नाले, तलाव कोरडे पडले होते. परंतु, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी, नाले वाहू लागले आहेत. दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने आजनगाव, सोनखांब, वाजबोडी, मरगसूर, वाई, कोंढासावळी गावांशेजारून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना पूर आला. खूप दिवसांनंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर पुराचा आनंद बघायला मिळाला. बुधवारी रात्री झालेला दमदार पाऊस गुरुवार पहाटे ओसरायला सुरुवात झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयाची वाट धरली होती. परंतु, दुपारी बारानंतर पावसाचा जोर वाढल्याने आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतील ज्या विद्यार्थ्यांना काटोल, कोहळी, मेटपांजरा येथे शिक्षणासाठी जावे लागते, त्यांना पावसाचा वाढता जोर बघून सर्वच शाळा-महाविद्यालयांनी मध्येच सुटी दिली.

नांद, वडगाव जलाशयांतून पाण्याचा विसर्ग
बेला : लोअरवेणा प्रकल्पाच्या नांद व वडगाव जलाशयातून गुरुवारच्या पहाटेपासून विसर्ग सुरू आहे. मात्र नदीपात्राच्या बाहेर पूर नसल्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू आहे. शेडेश्‍वर येथील नांद जलाशय 66.5 टक्‍के भरले असून धरणाचे तीन गेट 30 सेंटिमीटर उघडण्यात आले आहेत. तसेच वडगाव जलाशय 73.20 टक्‍के भरले असून 21 गेटपैकी सात गेटमधून वीस सेंटीमीटर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत कुळकर्णी यांनी दिली.
कार प्रकल्प 90 टक्‍के भरला; सतर्कतेचा इशारा
जलालखेडा, ता. 8 ः जिल्ह्यात आज पावसाची संततधार असल्यामुळे नरखेड तालुक्‍यातून वाहणाऱ्या कार नदीवर असलेला वर्धा जिह्यातील खैरी गावातील कारप्रकल्प 90 टक्‍के भरला आहे. यामुळे या नदीच्या खालच्या नरखेड तालुक्‍यातील खराशी, गुमगाव, जाटलापूर, लोहारीसावंगा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नरखेडचे तहसीलदार हरीश गाडे हे स्वतः तालुक्‍यात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आज दिवसभरात तालुक्‍यात 60 मिमी पाऊस पडला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dry river-drain "overflow"