"हम कभी नहीं सुधरेंगे'

File photo
File photo

नागपूर : शासकीय अधिकारी खेळाडू व शालेय क्रीडा स्पर्धांना किती गांभीर्याने घेतात, याचा उत्तम नमुना मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात आयोजित ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्या निमित्ताने सोमवारी पाहायला मिळाला. स्पर्धास्थळी कमरेपर्यंत गाजर गवत वाढल्याने अनेक शाळांच्या शारीरिक शिक्षकांनी त्याविरोधात संबंधितांकडे तीव्र नाराजी व्यक्‍त केली. जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली तक्रार व वाढता रोष लक्षात घेता आयोजकांना ही स्पर्धाच पुढे ढकलावी लागली. शालेय स्पर्धेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर येण्याची गेल्या आठ दिवसांतील ही तिसरी घटना होय.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित विविध वयोगटांतील मुलामुलींची शालेय मैदानी स्पर्धा सोमवारपासून मानकापुरातील सिंथेटिक ट्रॅकवर सुरू झाली. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार, धावण्याच्या स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवर व थ्रोइंग इव्हेंट्‌स ट्रॅकच्या मध्यभागी असलेल्या खुल्या मैदानावर होणार होत्या. मात्र, मैदानावर सर्वत्र गाजर गवत वाढल्याने शारीरिक शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. त्यांनी यासंदर्भात स्पर्धा संयोजक योगेश खोब्रागडे यांना विचारणा केली असता, खोब्रागडे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.
त्यामुळे सर्व शिक्षकांनी येथील गैरव्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एकूणच रोष बघता थाळीफेक, भालाफेक व हतोडाफेकीसह सर्व थ्रोइंग इव्हेंट्‌स ऐनवेळी रद्द करण्यात आले. तशी सूचना स्पर्धा खोब्रागडे यांनी उपस्थित विविध शाळांच्या शारीरिक शिक्षकांना दिली. उल्लेखनीय म्हणजे, गाजर गवतात सकाळी भला मोठा साप निघाला होता. त्यामुळे खेळाडूंसह पालकही घाबरून गेले होते.
झालेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार "डीएसओ'ने संपूर्ण स्पर्धाच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशीचे ट्रॅक इव्हेंट्‌स मात्र सुरळीत पार पडले. शिक्षकांनी यासाठी "डीएसओ'सोबतच तांत्रिक सहकार्य देणाऱ्या नागपूर जिल्हा ऍथलेटिक्‍स संघटनेलाही दोषी धरले आहे. मैदानावर एवढे गवत वाढले असताना त्यांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दिलीच कशी, असा प्रश्‍न अशफाक शेख, सचिन देशमुख, पद्माकर चारमोडे, डॉ. राहुल कलोडे, विशाल लोखंडेंसह अन्य शिक्षकांनी उपस्थित केला. शालेय स्पर्धांच्या वेळी अशा घटना अलीकडच्या काळात नियमितपणे होऊ लागल्या आहेत. पण, तरीही प्रशासकीय अधिकारी चुकांपासून धडा घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी विदर्भ हॉकी संघटनेच्या मैदानावर झालेल्या हॉकी स्पर्धेच्या वेळीसुद्‌धा खेळाडूंना चिखल व गुडघाभर गवतात खेळावे लागले होते. इनडोअर सभागृहात आयोजित कराटे स्पर्धेदरम्यानही प्रचंड गोंधळ उडाला होता. "हम कभी नहीं सुधरेंगे' अशीच भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली की काय, असे आता वाटू लागले आहे.

अधिकारी धडा घेणार काय?
कोट्यवधी रुपये खर्च करून नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक बांधण्यात आला. मात्र, ट्रॅकची नीट देखभाल होत नाही, प्राथमिक सुविधा नाही, त्यामुळे धावपटूंच्या सराव व स्पर्धांमध्ये अनेक अडचणी येताहेत. याऊलट चंद्रपूर आणि यवतमाळ येथेही सिंथेटिक ट्रॅकसह अत्याधुनिक स्टेडियम उभारल्या गेले आहे. त्या ठिकाणी सर्वकाही ठिकठाक आहे. नागपुरातील अधिकाऱ्यांनी त्यांच्यापासून धडा घेतला तर निश्‍चितच समस्या सुटू शकतात.

दोन-तीन दिवसांपूर्वी आमच्या प्रतिनिधींनी ट्रॅकला भेट देऊन स्पर्धा इन्चार्ज योगेश खोब्रागडे यांना मैदानावरील गवत काढायला सांगितले होते. खोब्रागडे यांनी त्यास होकारही दिला होता. मात्र, आज स्पर्धेच्या दिवशी गवत तसेच कायम होते. शालेय स्पर्धा म्हटली की, पुर्वतयारी आवश्‍यक असते. दुर्दैवाने ते झाले नाही.'
-डॉ. शरद सूर्यवंशी, सचिव, जिल्हा ऍथलेटिक्‍स संघटना

स्पर्धास्थळी शिक्षक व पालकांसाठी पेंडॉल उभारण्यात न आल्याची तसेच मैदानात गवत असल्याची तक्रार काही शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. ट्रॅकच्या मध्ये गवत होते. त्यामुळे आम्ही थ्रोइंग इव्हेंट्‌स मंगळवारी सॉफ्टबॉल मैदानावर घेण्याचा निर्णय घेतला होता. तरीही शिक्षकांनी तक्रार केली. '
-योगेश खोब्रागडे, स्पर्धा संयोजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com