आठ-दहा दिवसांच्या उघडिपीनंतर गोंदिया जिल्ह्यात बरसला...मग धानरोवणीही झाली सुरू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

गोंदिया शहरासह तालुक्‍यात मंगळवारी (ता. 23) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आठही तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता पेरणीच्या कामाला गती आली आहे. दुसरीकडे सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला गती दिली आहे.

गोंदिया : जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत मंगळवारी (ता. 23) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे मृगात टाकलेल्या धान पऱ्ह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. शेतकरी मोठ्या दमाने शेतीच्या कामात गुंतून गेला आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या बहुतांश भागात तर शेतकऱ्यांनी रोवणीचीही कामे हाती घेतली आहेत. आजच्या या पावसाने मात्र शेतकरी सुखावला आहे.

 

यंदा 1 लाख 89 हजार हेक्‍टर धानपीक लागवडीचे क्षेत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने निर्धारित केले आहे. हा टप्पा पार करण्यासाठी शेतकरी मृग नक्षत्रापासून शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. मृगाच्या हलक्‍या सरी कोसळल्यानंतर पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे वरथेंब्या पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीची कामे लांबणीवर टाकली होती.

 

शहरासह तालुक्‍यात दिवसभर झळ

सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी मात्र पेरणीची कामे आटोपती घेतली. गेली 15 ते 20 दिवस वातावरणात उघडझाप असल्याने अनेक शेतकरी पेरणीच्या चिंतेत होते. काही झाले तरी, वेळेत पेरणी व्हावी, याचा आटापिटा करताना दिसले. परंतु, सोमवारी रात्री चांगलाच बरसलेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. मंगळवारीदेखील पावसाची जिल्हाभरात रिपरिप सुरू होती. गोंदिया शहरासह तालुक्‍यात दिवसभर झळ होती.

पेरणीच्या कामाला गती

शिवाय, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, आमगाव, सालेकसा अशा आठही तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आता पेरणीच्या कामाला गती आली आहे. खते, बी-बियाण्यांची जमवाजमव करताना बहुतांश शेतकरी दिसत आहेत. बायको-पोरांसह शेतात राबताना दिसत आहेत. दुसरीकडे सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला गती दिली आहे.

जाणून घ्या : अधिक कमाईसाठी त्यांनी घेतली सगुणाची मदत; लागवड खर्चही करणार ती कमी

शहरातील रस्त्यांवर साचले तळे

गोंदिया शहरातील मुख्य रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. परंतु, हे खड्डे बुजविण्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. परिणामी, हलक्‍या पावसातही खड्ड्यांत पाणी साचून राहते. त्यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांसह वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to rains in Gondia district, paddy sowing started