सिवेज लाइन गळतीमुळे तीनशेवर विहिरी दूषित

file photo
file photo

नागपूर : शहरात सतराशे किलोमीटरपैकी निम्म्यापेक्षा सिवेज लाइनला गळती लागली असून, तीनशेवर विहिरी दूषित झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून सिवेज लाइन बदलण्याचे केवळ प्रस्ताव तयार होत असल्याने सांडपाण्याने दूषित विहिरींची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहेच; शिवाय पाणीटंचाईच्या काळात या विहिरींतील पाण्याचा वापरही होत नसल्याने महापालिका टंचाईवर खरेच गंभीर आहे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला असून, गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेवर धडक दिली. महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिक विहिरी, बोअरवेलकडे वळत आहे. परंतु, शहरातील अनेक भागातील विहिरी सिवेज लाइनच्या गळतीमुळे दूषित झाल्या आहेत. शहरात 755 विहिरी असून, 441 विहिरींची स्वच्छता केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 314 सार्वजनिक विहिरी स्वच्छ होऊच शकत नसल्याचे सूत्राने नमूद केले. विशेष म्हणजे या तीनशेवर विहिरींमध्ये सिवेज लाइनमधील सांडपाणी शिरत आहे. या विहिरी स्वच्छ करण्यासाठी जुन्या, जीर्ण सिवेज लाइन बदलणे गरजेचे आहे. त्याशिवाय या विहिरींतील पाणी वापरता येणार नाही, अशी पुस्तीही सूत्राने जोडली.
गळती असलेल्या सिवेज लाइन बदलण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविला असल्याचेही अधिकाऱ्याने नमूद केले. मात्र, असा प्रस्ताव यापूर्वीही अनेकदा तयार करण्यात आला. यापूर्वी सेंट्रल सिवेज झोन, नॉर्थ सिवेज झोन तसेच साऊथ सिवेज झोन अशाप्रकारे शहराच्या सिवेज लाइनसाठी प्रस्ताव तयार केला होता. जेएनएनयुआरएमअंतर्गत नॉर्थ सिवेज झोनला मंजुरीही मिळाली होती. मात्र, 2014 मध्ये केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर हा प्रस्तावच गुंडाळण्यात आला.
आता नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत सिवेज लाइनचा प्रस्ताव आहे. परंतु, अद्याप हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील सिवेज लाइनला गळतीचे प्रमाण वाढत असून, सार्वजनिक तसेच खासगी विहिरी दूषित होत आहे. सध्या पावसाची स्थिती बघता पुढील काळात भीषण टंचाईचे संकेत मिळत आहे. या 314 विहिरींची स्वच्छताही महत्त्वपूर्ण आहे. मात्र, प्रशासन हातावर हात ठेवून असल्याने भविष्यात पाण्यासाठी शहरात संतापाची लाट उसळण्याचे संकेत गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोर्चाने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com