अचानक दूध संकलन बंद केल्याने शेतकरी संतप्त

संजय खेडेकर
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

भंडारा येथील दूध प्रक्रिया केंद्र बंद झाल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील प्रमुख दूध संकलन केंद्र असलेल्या चिखली शहरातील दूध संकलन व शितकरण केंद्रावर मंगळवार (ता.28) पासून शेतकर्‍यांचे दूध स्विकारणे अचानक बंद केले. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्रावर आणलेले दूध घरी परत नेवून त्याचे करायचे काय? संतप्त शेतकरी आणि पदाधिकार्‍यांनी दूध शितकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरून शेतकर्‍यांचे दूध संकलित केलेच पाहिजे असा आग्रह धरला.

चिखली (जि.बुलडाणा)- भंडारा येथील दूध प्रक्रिया केंद्र बंद झाल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील प्रमुख दूध संकलन केंद्र असलेल्या चिखली शहरातील दूध संकलन व शितकरण केंद्रावर मंगळवार (ता.28) पासून शेतकर्‍यांचे दूध स्विकारणे अचानक बंद केले. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्रावर आणलेले दूध घरी परत नेवून त्याचे करायचे काय? संतप्त शेतकरी आणि पदाधिकार्‍यांनी दूध शितकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरून शेतकर्‍यांचे दूध संकलित केलेच पाहिजे असा आग्रह धरला.

मात्र वाद वाढत गेल्याने या शेतकरी आणि पदाधिकार्‍यांनी घरी नेवून दुधाचे नुकसान करण्यापेक्षा केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दुधाने अंघोळ घालून निषेध व्यक्त केला. अखेर पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या समन्वयातून दुग्धव्यवसाय विभागाच्या वरीष्ठांशी चर्चा केल्यानंतर काहिसा सन्मानजनक तोडगा काढण्यात आल्याने संतप्त शेतकरी शांत झाले. 

अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. तर काही शेतकरी पूर्णवेळ दुग्धव्यवसायामध्ये असल्याचे सुध्दा पहावयास मिळते. या शेतकर्‍यांचे दूध सहकारी दुध डेअर्‍यांमार्फत शासकीय दूध शितकरण केंद्रावर संकलित होवून आजपर्यंत भंडारा येथील शासकीय दूध प्रक्रिया केंद्राकडे पाठविले जात असे. मात्र हे केंद्र काही कारणास्तव बंद झाल्याने आता स्थानिक शितकरण केंद्रावरील दूध हे कोल्हापूर येथील दूध प्रक्रिया उद्योगाकडे पाठविण्यात येत आहे. मात्र हे दूध कोल्हापूर येथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर कारणांमुळे योग्य दर्जाचे नसल्याचे कारणावरून संकलित दूध प्रक्रिया केंद्राने नाकारले. या कारणावरून अचानक स्थानिक शितकरण केंद्रावरून शेतकर्‍यांचे दूध स्विकारण्यास नकार देण्यात आल्याने आता या शेकडो लीटर दुधाचे घरी नेवून करणार काय? असा सवाल उपस्थित झाल्याने या शेतकर्‍यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकार्‍यांना दूध शितकरण केंद्रावर पाचारण करून त्यांच्यासमोर आपली समस्या मांडली.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, रयतचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, राष्ट्रवादीचे शंतनू पाटील यांनी दुग्ध व्यवसाय विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून सहकारी दूध डेअरीने दूध गोळा केल्यानंतर दूध शितकरण केंद्रावर लगेचच निर्धारीत वेळेत आणून द्यावे तरच ते दूध स्विकारण्यात येईल, असा तोडगा काढण्यात आला आणि पदाधिकार्‍यांच्या समक्षच उपस्थित शेतकर्‍यांचे दूध स्विकारण्यात आले. मात्र यापूर्वी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी दूध घरी परत नेण्याऐवजी शितकरण केंद्रावरील अधिकार्‍यांना या दुधाने अंघोळ घातली. यावेळी डॉ.सत्येंद्र भुसारी, शंतनू पाटील, विनायक सरनाईक, शिवशंकर इंगळे, प्रशांत देशमुख, कृष्णा मुरकूटे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, अशोक तायडे, रमेश टेकाळे, विलास पाटील, अविनाश पाटील, पांडुरंग शिंगणे, गणेश शिंगणे, विवेक ठाकरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: due to stop milk collection farmers Angry