वेतन रखडल्याने जीएमसीच्या डॉक्टरांनी उपसले संपाचे हत्यार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

जीएमसीच्या कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांचे चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याने सुमारे 91 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक दिवसीय संपाचे हत्यार उपसून सर्वाेपचार रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

अकोला : जीएमसीच्या कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांचे चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याने सुमारे 91 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 22) एक दिवसीय संपाचे हत्यार उपसून सर्वाेपचार रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 
 
डिसेंबर ते एप्रिल 2019 या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी डाॅक्टरांच्या कुटुंबियांवर उपसमारीची वेळ आली होती. डॉक्टरांच्या वेतनाचा मुद्दा सोडविण्यासाठी विविध संघटनांच्यावतीने डीन डॉ. कुसुमाकर घोरपडे व जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते. त्यानंतर काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागला होता, तरी काहींना वेतनाची प्रतीक्षा असल्याने अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी सर्वोपचार रुग्णालयात एकत्र येवून संप पुकारला. या संपाची दखल घेत रजेवर असलेले डीन डॉ. कुसुमाकर घोरपडे हे तातडीने कर्तव्यावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांच्या समस्या जाणून घेत वेतनाचा मुद्दा निकाली काढल्या जाणार असल्याचे सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याचे सुचना सुद्धा त्यांनी केल्या.

तर डाॅक्टरांना दाखवू घरचा रस्ता -
सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने शेकडो रुण सर्वाेपचार रूग्णालयात उपचारार्थ येतात. मात्र वैद्यकीय अधिकारी संपाचे हत्यार उपसणार असल्याचे पुर्व सुचना प्रशासनाला असल्याने यासंदर्भातील नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे या संपाचा रूग्णसेवेवर विशेष परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. रुग्णसेवेवर परिणाम झाल्यास संपात सहभागी असलेल्या डॉक्टरांना यासंदर्भातील सुचना देण्यात येईल. याकडे दुर्लक्ष केल्यास तडकाफडकी त्यांना कार्तव्यावरून कमी करण्यात येईल, असा इशारा सुद्धा डीन डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी दिला आहे. 

एक दिवसीय सामुहिक रजेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले आहे. या संपाचा आरोग्य सेवेवर विशेष परिणाम झालेला नाही. सर्व रूग्णसेवा सुरळीत आहेत. डाॅक्टरांच्या वेतनाचा मुद्धा तातडीने मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. 
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वाेपचार रूग्णालय अकोला. 

 

Web Title: Due to the stopping salary the GMC doctor doing agitation at akola