सुप्रिया सुळे यांच्यामुळे चिमुकलीच्या वडिलांना बसला सुखद धक्का, अशी केली मदत...

Due to Supriya Sule, Chimukli medicine reached home
Due to Supriya Sule, Chimukli medicine reached home

पुसद (जि. यवतमाळ) : पाच वर्षांची चिमुकली... दुर्धर व्याधीने ग्रासलेली... नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्‍टरांनी तिला लिहून दिलेली आवश्‍यक औषधी लॉकडाउनमुळे देशभर शोधूनही मिळत नव्हती... दिवसागणिक वडिलांची तगमग वाढत गेली... अखेर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना व्हॉट्‌सऍपवरून मेसेज पाठवला... काहीतरी चांगलं घडेल, असा आशावाद जोपासत असतानाच बुधवारी (ता. 15) भल्या पहाटे चिमुकलीची औषधी पुसदला घरी पोहोचली अन्‌ तिच्या वडिलाला सुखद धक्का बसला... 

लॉकडाउनमुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः आरोग्यविषयक प्रश्‍नांची मोठी भर पडली आहे. वरुड (ता. पुसद) येथील पाच वर्षांची चिमुकली दुर्धर रोगाने आजारी आहे. तिच्यावर मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये डॉ. साजिद कुरेशी यांनी जानेवारी रोजी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तिला नागपूर येथील रुग्णालयात दाखविले. रेडिओलॉजी व पेट स्कॅन केल्यानंतर डॉ. पंकज द्विवेदी यांनी काही औषधे घेण्यास सांगितली. नेमके याच दिवशी 23 मार्च रोजी कोरोनामुळे देश लॉकडाउन झाला. चिमुकलीच्या जीवनमरणाचा प्रश्‍न असल्याने तिचे वडील अस्वस्थ झाले. ही औषधी केवळ युएस मध्येच तयार होते, असे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले. 

त्यानंतर चिमुकलीच्या वडिलांनी औषधासाठी नागपूर, हैदराबादपासून तर दिल्लीपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून सतत सर्च केला. मात्र, कोठूनही प्रतिसाद मिळाला नाही. हैदराबाद येथील एका डीलरने किमतीच्या दुप्पट पैशात आणि तेही लॉकडाउन उघडल्यानंतर औषधी पाठवू, असे सांगितले. त्यामुळे त्यांची तगमग अधिकच वाढली. एकीकडे मुलीच्या प्रकृतीची काळजी तर दुसरीकडे लॉकडाउनमध्ये औषधी मिळविणे दुरापास्त. त्यांनी थेट कॅनडा येथील औषधी कंपनीत मेल केला. परंतु, त्यांनीही असमर्थता व्यक्त केली. 

आता कोण मदत करणार? असा प्रश्न मनात घोळत असतानाच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा वैयक्तिक व्हॉट्‌सऍप नंबर मिळविला. निकड असलेली औषधी मिळवून देण्यासाठी त्यांनी विनंती केली. सुप्रियाताईंनी चक्र फिरविले. नेटवर्क पाठपुराव्यातून तिसऱ्या दिवशी औषधी घरी पोहोचली आणि वडिलांचा जीव भांड्यात पडला. 

सामाजिक दायित्वाचा वेगळा अनुभव आला

औषधे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य अभिजित राऊत यांनी पुसदला पोहोचविली. या संदर्भात संपर्क साधला असता राऊत म्हणाले, "मुलीच्या वडिलांचा मॅसेज मिळताच सुप्रियाताईंनी ता. आठ रोजी मला लगेच फोन केला. औषधी मिळविण्यासाठी दिल्ली येथील काही संपर्क त्यांनी दिले. औषधे मिळवावी, असे कळकळीने सांगितले व सातत्याने व्यस्ततेतही पाठपुरावा केला. मी डॉ. जोगळेकर यांच्याशी संपर्क करून डिस्ट्रीब्युटर्स नेटवर्कमध्ये हालचाली केल्या व अखेर दिल्ली येथील एका डिस्ट्रीब्यूटरकडे औषधींच्या दोन बाटल्या मिळाल्या. लगेच ता 13 रोजी ब्लू-डॉट कुरियरने नागपूरला पोहोचल्या. त्या पुसदला पोचविण्यासाठी वाहन परवानगीसाठी सलील देशमुख यांनी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, दैनिक "सकाळ' नागपूरशी संपर्क केला. त्यांनी हा प्रश्न लगेच सोडविला. "सकाळ'च्या पार्सल गाडीने औषधीचे कुरियर पाठविण्यास त्यांनी मदत केली आणि सामाजिक दायित्वाचा एक वेगळा अनुभव आला.

मी 'सकाळ'चा आभारी

कोरोनाच्या लढाईत लॉकडाउनमुळे जीवन ठप्प झाले. अशा स्थितीत सुप्रियाताई यांनी एका मेसेजवर माझ्या मुलीचे औषध घरी पोहोचविण्यापर्यंत मदत केली. त्यांच्या या कळकळीने मी भारावून गेलो आहे. यासाठी नागपूर येथील अभिजित राऊत, समीर देशमुख, आमदार इंद्रनील नाईक, दैनिक "सकाळ'चा मी मनस्वी आभारी आहे. लॉकडाउनमधील हा प्रसंग माणुसकीचा सुगंध प्रत्ययास आणतो, अशी प्रतिक्रिया चिमुकलीच्या वडिलांनी व्यक्ती केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com