दाऊदकडून धमकी आल्याने चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर  ः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित "कॉफी विथ डी' या विनोदी चित्रपटातील काही प्रसंगांवर नाराज होऊन दाऊदच्या हस्तकाने नागपुरातील निर्माते विनोद रामानी यांना चित्रपट प्रदर्शित केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतविल्यामुळे कर्जबाजारी झालेले विनोद यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. रामानी हे नागपुरातील नामांकित औषध व्यापारी होते. त्यांची शहरात ऍपेक्‍स मेडिकल्स नावाने पाच दुकाने आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद चिमनदारस रामानी (वय 44, रा.

नागपूर  ः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित "कॉफी विथ डी' या विनोदी चित्रपटातील काही प्रसंगांवर नाराज होऊन दाऊदच्या हस्तकाने नागपुरातील निर्माते विनोद रामानी यांना चित्रपट प्रदर्शित केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतविल्यामुळे कर्जबाजारी झालेले विनोद यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सोमवारी दुपारी उघडकीस आली. रामानी हे नागपुरातील नामांकित औषध व्यापारी होते. त्यांची शहरात ऍपेक्‍स मेडिकल्स नावाने पाच दुकाने आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद चिमनदारस रामानी (वय 44, रा. कीर्ती अपार्टमेंट, निकालस मंदिराजवळ) यांनी 2016 मध्ये "कॉफी विथ डी' या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले होते. या चित्रपटात कॉमेडी स्टार सुनील ग्रोवर आणि दीपानिता शर्मा आहेत. 2017 मध्ये हा चित्रपट तयार झाला होता. रामानी आणि मिश्रा यांनी मोठा कार्यक्रम आयोजित करून प्रमोशनही केले. चित्रपटाचे प्रोमो यू-ट्यूबवर गाजले. मात्र, यात दाऊद इब्राहिमची खिल्ली उडविल्यामुळे अंडरवर्ल्डमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे दाऊदचा "राइट हॅंड' छोटा शकील याच्याकडून चित्रपट निर्माते विनोद रामानी यांना फोनवरून धमकी मिळाली. शकील यांचे नाव घेऊन धमकी देणाऱ्याने विनोद यांना चित्रपटातील संवाद बदलण्याची तसेच दाऊदची खिल्ली उडविणारे सीन कट करण्यास धमकावले होते. तसे न केल्यास जीव गमवावा लागेल, असेही सांगितले. त्यामुळे घाबरून विनोद रामानी आणि विशाल मिश्रा यांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटासाठी विनोद आणि त्यांच्या चार-पाच मित्रांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मात्र, दाऊद इब्राहिमच्या वतीने धमकी आल्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाला नाही. कोट्यवधीचे कर्ज फेडताना त्यांची बरीच दमछाक होऊ लागली. त्यामुळे ते काही महिन्यांपासून तणावात होते. तीन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुले माहेरी गेली होती. त्यामुळे विनोद एकटेच घरी होते. त्यांनी घरात सीलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच तहसील पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. रामानी यांचा मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी मेयोत पाठवला. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला. दोन दिवसांपासून रामानी यांचे घर बंद दिसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. तसेच त्यांच्या घरातून उग्र वास येत होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता पोलिसांना फोन केला आणि माहिती दिली. पोलिसांनी लगेच पोहोचून दाराचा कोंडा तोडला. घरात विनोद यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला."विनोद तेरे को प्यार से बोल रहा हूं. फिल्म में भाई का बहोत मजाक उडाया हैं. सीन काट ले और डॉयलॉग भी बदल दे. वर्ना तेरे को फॅमिली के साथ टपका दुंगा. थेटर मे धुसके गोली मार दुंगा' अशी धमकी डी गॅंगचा सदस्य छोटा शकील याच्याकडून बोलणाऱ्याने रामानी यांना दिली होती. घाबरून रामानी यांनी चित्रपट प्रदर्शित केला नाही. त्यामुळे कोट्यवधीचे कर्ज डोक्‍यावर बसले.दिग्दर्शक विशाल मिश्रा आणि विनोद रामानी यांना दुबईच्या क्रमांकावरून धमकीचा कॉल आला होता. त्यामुळे रामानी आणि मिश्रा यांनी दिल्लीचे पोलिस उपायुक्‍त बी. के. सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. पोलिसांनी तक्रारीवरून छोटा शकील याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to threat from Dawood Filmmaker suicides