‘डमी ईव्हीएम’ मिळाली भाजप उमेदवाराच्या घरात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

अकोला - प्रभाग क्र. १३ अ मधील भाजपचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यामध्ये पाच डमी ईव्हीएम मशीन मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर ठाण्यात ठाण मांडून होते. आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अकोला - प्रभाग क्र. १३ अ मधील भाजपचे उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यामध्ये पाच डमी ईव्हीएम मशीन मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर ठाण्यात ठाण मांडून होते. आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील या प्रभाग क्र. १३ अ मधून जात असताना त्यांना भाजपचे उमेदवार देवराव अहीर यांच्याघरी गर्दी दिसली. त्यांनी नागरिकांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्याचवेळी देवराव अहीरही तिथे आले. त्यांच्यासोबतही बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावून त्यांच्या घराची झडती घेतली. या झडतीमध्ये पाच डमी ईव्हीएम मशीन मिळून आल्या. यासंदर्भात त्यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडून समर्पक उत्तर मिळाले नाही. शेवटी त्यांना सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तसेच त्या मशीनही जप्त करण्यात आल्या. या घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनीही ठाणे गाठले. या प्रकरणाबाबत आमदार रणधिर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व नगरसेवक आशिष पवित्रकार, नगरसेवक सुनील मेश्राम यांनीही पोलिस अधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ठाणेदार अन्वर शेख यांच्याकडून देवराव अहीर यांची चौकशी करण्यात येत होती. 

प्रचारात वापरल्या मशीन 
भाजपचे उमेदवार देवराव अहीर यांनी प्रचारादरम्यान ही मशीन वापरल्या असल्याची माहिती आहे. या मशीनवर कोणत्या उमेदवाराचे नाव कोणत्या क्रमांकावर आहे, असे त्यामध्ये दाखविले आहे. तसेच त्या मशीन पूर्णपणे बंद आहे. कुठलेच मतदानाचे काम त्यामधून होत नाही. एक रिकामा प्लास्टिकचा बॉक्स व त्यावर उमेदवारांचे नाव व चिन्ह होते. मतदारांना या मशीन दाखवून भाजपचे उमेदवार या क्रमांकावर असल्याचे दाखविण्यात आले असल्याची माहिती आहे. 

मशीन वापरण्यासाठी परवानगी नाही 
उमेदवारांना कुठलेही प्रचार साहित्य वापरण्यासाठी निवडणुक विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. देवराव अहीर यांनी प्रचारात हे साहित्य वापरले असेल तर त्याची परवानगी होती का? याचाही आढावा पोलिस घेत आहेत. त्यासंदर्भातील कागदपत्रेही पोलिस त्यांच्याकडून मागून घेत असल्याचे समजते. 

३०० रुपयांत मिळतात मशीन 
डमी ईव्हीएम मशीन या ३०० रुपयांमध्ये सहज कुठेही उपलब्ध असल्याची चर्चा पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्यांमध्ये होते. गांधी रोड येथून त्या विकत आणल्या असल्याचेही अनेकांच्या चर्चेमधून दिसून आले. 

भाजपच्या तिन उमेदवारांवरच कारवाई का? 
अकोट फैलमधील अनिता राजेश चौधरी यांच्या घरातून अकोट फैल पोलिसांनी एक लाख १५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर दुसरी कारवाई दोन दिवसांनी भाजपचे मात्तबर उमेदवार विजय अग्रवाल यांच्यावर आचारसंहिता भंगचा गुन्हा नोंदविण्यात आला. देवांच्या छायाचित्रासोबत स्वत:चे छायाचित्र प्रकाशित करून त्यांनी आचारसंहिता भंगचा गुन्हा केला. तिसरी कारवाई मतदानाच्या दिवशी प्रभाग क्र. १३ अ च्या भाजप उमेदवार सुजाता देवराव अहीर यांच्याकडे झाली. बनावट ईव्हीएम मशीन तयार करून त्यांनी मशीन प्रचारात वापरल्याचा ठपका ठेऊन आचारसंहिता भंगचा गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे, हे तिन्ही उमेदवार भाजपच्या एका लोकप्रतिनिधीच्या गटातील आहेत. 

डमी मशीन विकणाऱ्यांवर कारवाई का नाही? 
तहसील कार्यालयासमोर एका दुकानदाराने डमी ईव्हीएम मशीन विक्री केल्याची चर्चा आहे. या मशीन विकताना त्यांच्याकडे कुठला परवाना होता, याचीही चौकशी होणे आवश्‍यक आहेत. त्यासोबतच डमी मशीन वापरल्याप्रकरणी जर कारवाई होत असेल तर मशीन विक्रेत्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी चर्चा निघत आहे. 

निवडणुक काळामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेश असतात. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मुंबई पोलिस कायद्यानुसार उमेदवार व त्यांचे पती यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
विजयकांत सागर, अप्पर पोलिस अधीक्षक, अकोला. 

Web Title: Dummy EVM BJP candidate in the house