भांडेवाडीवासींच्या तळपायाची "आग' मस्तकात!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

शेकडो महिलांचा रास्ता रोको - दिवसभर विषारी धुरात वस्त्या

शेकडो महिलांचा रास्ता रोको - दिवसभर विषारी धुरात वस्त्या
नागपूर - पंधरा दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे विषारी धुरात हरवलेल्या भांडेवाडी, वाठोडासह अनेक वस्त्यांना सोमवारी पुन्हा डम्पिंग यार्डमधील आगीने कवेत घेतले. सतत आग व निघणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांची तळपायाची आग मस्तकात गेली. विशेषतः परिसरातील महिलांनी भांडेवाडी डम्पिंग यार्ड हटविण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले.

काल रात्रीपासून डम्पिंग यार्डला आग लागली असून, परिसरातील वस्त्याही धुरामुळे दिसेनाशा झाल्या होत्या. सकाळी आग वाढली अन्‌ भांडेवाडी, वाठोडा, पवनशक्तीनगर, अब्बुमियानगर, सावननगर, साहीलनगर, अंतुजीनगर, देवीनगर, सूरजनगर, संघर्षनगर, मेहरनगर आदी वस्त्यांसह एक किलोमीटर परिसर धुरात हरविला. यामुळे परिसरातील नागरिक व महिलांनी वाहतूक रोखून धरत रास्ता रोको केला. "कधीपर्यंत आम्ही हा त्रास भोगायचा, कधीपर्यंत महापालिका आमच्या आरोग्याशी खेळ करणार' असा सवाल करीत महापालिकेवर संताप व्यक्त केला.

नागरिकांचा रोष बघता आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक बंटी कुकडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार व पोलिसही येथे पोहोचले. आग विझविण्याचा प्रयत्न करतानाच पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिक रस्त्यावर आल्याने नवनिर्वाचित सभापती मनोज चाफले यांनाही परिस्थिती हाताळणे अशक्‍य झाले. त्यांनी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याने नागरिकांनी रस्ता मोकळा केला. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या 14 गाड्यांनी पाण्याचा मारा केला.

परीक्षा देताना विद्यार्थी त्रस्त
परिसरात दहा शाळा असून, तेथे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहे. परंतु, आगीच्या धुरामुळे शालेय विद्यार्थीही त्रस्त झाले. पेपर कसा सोडवावा, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला. या धुरामुळे येथील शाळांतील विद्यार्थ्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

मिथेन गॅसमुळे आग
आतापर्यंत कुणीतरी विडी, सिगारेट टाकल्यामुळे आग लागल्याचे सांगितले जात होते. परंतु, डम्पिंग यार्डमधील कचऱ्यातून निघणाऱ्या मिथेन गॅस व उन्हामुळे आग लागत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या कचऱ्यावर प्रक्रिया आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

डम्पिंग यार्डमध्ये कचरा साठविण्याची क्षमता संपुष्टात आली आहे. डम्पिंग यार्डच्या पुढे साडेतीनशे एकर जागा आहे. यापैकी शंभर एकर जागा सिम्बॉयसिसला दिली आहे. अडीचशे एकर जागेवर कचरा साठविण्याचा उपाययोजना करून भांडेवाडीतील आगीवर आळा घाला.
- प्रा. सचिन काळबांडे, पूर्व नागपूर स्वच्छता समिती.

Web Title: dumping yard fire