अकोट-अकोला रस्त्यावर आणखी वर्षभर खावी लागणार धुळ

akola akot
akola akot

अकोला : अकोला ते अकोट दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची दोन वर्षांची मुदत संपली. त्यानंतर वाढिव मुदतही कामाची प्रगती नाही. त्यामुळे कंत्राट टर्मिनेशनचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. आता नव्याने कंत्राटदाराला मुदत वाढ मिळण्याची शक्यता नाही. मार्चमध्ये नव्याने निविदा उघडण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. मात्र त्यामुळे अकोला-अकोट रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना आणखी वर्षभर तरी धूळ खातच प्रवास करावा लागणार असल्याचे दिसते.


अकोला ते बैतूलपर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अकोला-अकोटपर्यंतच्या टप्प्यातील काम तीन वर्षांपासून अर्धवट आहे. पुण्यातील एम.बी. पाटील या कंत्राटदाराने हे काम घेतले आहे. तीन वर्षांत या कंपनीला अपेक्षित काम करता आले नाही. अनेक अडचणी येत असल्याचे कारण पुढे केल्याने वर्षभराची मुदत वाढ देवूनही रस्त्याच्या कामात कोणतीच प्रगती नाही. त्यामुळे आजही या रस्त्याने जाणाऱ्यांना धक्के आणि धूळ खातच जावे लागत आहे. डिसेंबर 2019 च्या दिलेल्या मुदत वाढीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठरवून दिलेली अकरा कोटीची कामेही कंपनीला पूर्ण करता आली नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलत कंपनीच्या कंत्राट टर्मिनेशनचा प्रस्तावच केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविला आहे. दुसरीकडे नवीन कंत्राटदार नियुक्त करून हे काम पूर्ण करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्येच निविदा उघडण्यात येणार होत्या. मात्र केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याला मुदतवाढ दिल्‍याने आता मार्चअखेर निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे.


लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले
तीन वर्षांपासून अकोला-अकोट रोड खोदून ठेवला आहे. पावसाळ्यात चिखलामुळे तर आता धुळीमुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहनधारक त्रस्त आहेत. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. कावड-पालखी मार्ग असल्याने भाविकांना होणारा त्रास बघता आंदोलनही करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत ‘अर्थपूर्ण’ मूग गिळून बसले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कंत्राट कंपनीचे चांगलेच फावले आहे.


ऑगस्ट 2019 मध्येच संपली मुदत
अकोला ते अकोटपर्यंत महामार्गाचे काम ऑगस्ट 2017 मध्ये सुरू झाले होते. हे काम पूर्ण करण्याची मुदत ऑगस्ट 2019 मध्ये संपली. त्यापूर्वीच जून 2019 मध्ये झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्रीय मंत्रालयाने कंत्राटदार कंपनीला डिसेंबर 2019 पर्यंत काही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्यांक दिले होते. या मुदतही दिलेले लक्ष्यांक कंपनीला पूर्ण करता आले नाही. त्यामुळे डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या आढावा बैठकीत कंत्राट टर्मिनेशनचा प्रस्ताव अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांनी पाठविला होता.


उपकंत्राटदार नियुक्तीकरूनही अर्धवट काम
अकोला-अकोट मार्गाचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीला मुदतीत कामे पूर्ण करता आली नाही. त्यामुळे उपकंत्राटदार नियुक्त करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार अकोला ते गांधीग्राम व गांधीग्राम ते देवरी-अकोटपर्यंतच्या कामासाठी साठे व राही रिलेटर या उपकंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरही कामात फारशी प्रगती झाली नाही.


224 करोडचा प्रकल्प
अकोला-अकोटपर्यंतच्या 39 किलोमीटर महामार्गाचे काम करण्यासाठी 224 करोडचे प्रकल्प अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यात एक मोठा पूल, 10 लहान पूल, 47 बॉक्स कल्व्हेटर आणि काँक्रिटीकरणाचा समावेश होता. यातील बहुतांश कामे आजही अर्धवट आहेत.


म्हणे, अतिवृष्टीमुळे कामे प्रभावित!
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने महामार्गाच्या कामात अडथळे आल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे महामार्गाच्या कामासाठी लागणारे गौण खनिज वेळेत मिळू शकले नसल्याने कामात प्रगती झाली नाही, असे कारण पुढे करून कंत्राटदार कंपनीने मुतदवाढ घेतली होती. विशेष म्हणजे, एम.बी. पाटील या कंत्राटदाराकडे राज्यातील महामार्गाच्या सहा मोठ्या प्रकल्पांची कामेही आहेत.


गांधीग्रामपर्यंतच्या कामाला प्राधान्य
अकोला जिल्ह्यातील कावड-पालखीचे महत्त्व लक्षात घेता अकोला येथील आपातापा चौक ते गांधीग्रामपर्यंतचे काम प्राधान्याने पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com