सत्ताधीशांना सत्य सांगणे हे माध्यमांचे कर्तव्य

नागपूर ः अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानच्या पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात मध्यभागी अरुण शौरी. यावेळी उपस्थित डावीकडून डॉ. उदय निरगुडकर, रणजित देशमुख, प्रा. सुरेश द्वादशीवार, विजय बावीस्कर, आशीष देशमुख. मागे पुरस्कारप्राप्त पत्रकार आणि पुरस्कार निवड समि
नागपूर ः अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानच्या पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात मध्यभागी अरुण शौरी. यावेळी उपस्थित डावीकडून डॉ. उदय निरगुडकर, रणजित देशमुख, प्रा. सुरेश द्वादशीवार, विजय बावीस्कर, आशीष देशमुख. मागे पुरस्कारप्राप्त पत्रकार आणि पुरस्कार निवड समि

नागपूर : पत्रकारिता हे मनोरंजन किंवा माहिती सांगणारे नव्हे तर सत्य सांगण्याचे माध्यम आहे. त्यामुळे फक्त इंटरनेटवर उपलब्ध माहिती न देता घटनेमागील सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार, अर्थतज्ज्ञ व माजी केंद्रीयमंत्री अरुण शौरी यांनी केले. यावेळी त्यांनी सत्ताधारी हे पत्रकारांचा साधन म्हणून वापर करीत असल्याने त्यांच्याशी सलगी करू नये असाही सल्ला दिला.
अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानचा पत्रकारिता पुरस्कार सोहळा आज वनामती सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणजित देशमुख होते. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आशीष देशमुख, कार्यवाह जवाहर चरडे, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर आणि अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीतील ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, प्रमोद माने, अभय देशपांडे, अरुण नाईक, शैलेश पांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अरुण शौरी म्हणाले, सध्या माध्यमांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ती माध्यमांनी स्वतः घालवली आहे. संपादक अंतर्गत दबावात काम करीत असल्याचे दिसत आहे. सत्तेचे नियम अंगीकारल्यावर तक्रार करणे चुकीचे आहे. सत्ताधारी सरकारच्या मागे उद्योगपतींचे एक सरकार असते. कुठलाही पक्ष सत्तेत आला तरी, पडद्यामागील उद्योगांचे सरकार कायम राहते. माध्यमांतही या उद्योगांनी शिरकाव केला आहे. माध्यमांनी सत्य लपविण्यामागे भीती नसून लोभ कारणीभूत आहे. पत्रकारांनी आपल्या मूल्यांशी तडजोड करता कामा नये. तडजोड केली की समोरचा व्यक्ती मोल लावायला सुरुवात करतो आणि तिथेच विश्‍वसनीयता संपते, असेही शौरी यांनी सांगितले. सूत्रसंचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले. जवाहर चरडे यांनी आभार मानले.
ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार विजय बावीस्कर यांना मुद्रित माध्यमातील उत्कृष्ट कामगिरीबाबत, डॉ. उदय निरगुडकर (इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातील उत्कृष्ट कामगिरी), सुनील चावके (राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट मराठी पत्रकारिता), निशांत सरवणकर (उत्कृष्ट शोध पत्रकारिता), विजय गायकवाड (उत्कृष्ट कृषी पत्रकारिता), रामराव जगताप (ई - मीडियातील उत्कृष्ट कामगिरी), न. मा. जोशी (उत्कृष्ट सामाजिक पत्रकारिता), दीपा कदम (उत्कृष्ट महिला पत्रकारिता) यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.
सत्तेला सत्य आवडत नाही
सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वृत्तपत्रांना अधिक बाजारीकरणाचे स्वरूप आल्याचे सांगितले. बाजारीकरणात ज्यांनी प्रतिष्ठा जपली त्यांना अभिवादन केले पाहिजे. सत्तेला सत्य आवडत नाही. सत्य सांगणाऱ्याला विदूषकांची अथवा क्रांतिकारकाची भूमिका पार पाडावी लागते. पत्रकारांना या दोन्ही भूमिका जमत नसल्याने खरी अडचण आहे. सामान्य माणसाला प्रामाणिक आणि अप्रामाणिक यातील फरक कळत असल्याने, सत्य लपविणे कठीण झाले आहे, असे द्वादशीवार म्हणाले. डॉ. उदय निरगुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com