चंद्रपुरात भूकंपसदृश्‍य धक्के

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : चंद्रपुरात मंगळवारी (ता. 13)सकाळी 11 वाजताच्या सुमाराला काही भागात भूकंपसदृश्‍य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वीही शहरात असे धक्के जाणवले आहेत. मात्र ते भूकंपाचे नसल्याने तेव्हा समोर आले होते. आता पुन्हा तोच प्रकार घडला आहे.

सन 2005 मध्ये चंद्रपूर शहरात अशा धक्‍क्‍यांची मालिकाच सुरू होती. तेव्हा तज्ज्ञांना बोलावून प्रशासनाने याची चौकशी केली. त्यात वेकोलिच्या ब्लॉस्टिंगमुळे शहराला धक्के जाणवत असल्याचे समोर आले. मात्र वेकोलिने ते मान्य केले नाही. जादा कोळसा काढण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिकचे ब्लॉस्टिंग केले जाते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे असे धक्के शहराला अधेमध्ये जाणवतात. आजही शहरातील तुकूम, ताडाळी, पडोली आणि चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात सकाळी 11 वाजताच्या सुमाराला अगदी काही क्षण असे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. यासंदर्भात अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी मात्र भूकंपाचे धक्के असल्याचे नोंद कुठेही नाही, असे स्पष्ट केले. वेकोलिकडेही ब्लॉस्टिंग संदर्भात विचारणा केली. मात्र खाणीत कुठेही ब्लॉस्टिंग केले नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र ज्यांनी हा प्रकार अनुभवला ते अद्यापही धक्के जाणवले यावर ठाम आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake shocks in Chandrapur