भाऊ, मी काय म्हणतो खर्ऱ्यापेक्षा काजू खा ना...! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 November 2019

> गडचिरोलीतील पानठेल्यावर लागलेले नवे दरपत्रक 
> खर्ऱ्याचे भाव गगनाला, तरी खाणे सुरूच 
> किमतीने अर्धशतक गाठूनही वाढतच आहे मागणी 
> शौकीनांचे खिसे हलके 
- महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थीही खर्ऱ्याच्या विळख्यात

गडचिरोली : "शौक बडी चीज हैं', "इस सिमेंट मे जान हैं' अशा जाहिराती पाहून आपल्याला काही तरी विचित्र पाहले किंवा ऐकल्यासारखे वाटते. मात्र, यातून कोणत्या ना कोणत्या वस्तूंची जाहिरात केली जाते. अशीच व्यसनाची जाहिरात चौका चौकात, गल्लो गल्ली तसेच युवकांच्या ग्रुपमध्ये सतत सुरू असते. आश्‍चर्य वाटत आहे ना... वरील वाचून. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगता? पण हे खरं आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय? विश्‍वास ठेवा अशी जाहिरात युवकांमध्ये होत असते. 

No photo description available.
गडचिरोलीत लागलेले खऱ्याचे नवीन दर बोर्ड 

पुरुष म्हटलं तर त्याला कोणते ना कोणते व्यसन जडलेले असते. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, खर्रा अशा व्यसनाच्या आहारी पुरुष गेलेला असतो. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढतच आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले; मात्र दारू पिणाऱ्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही. वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली सारख्या जिल्ह्यांत दारूबंदी आहे. मात्र, पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. यामुळेच सरकारने दारूसह तंबाखूजण्य पदार्थांवर बंदी घातली आहे. मात्र, शौकीन आपले शौक पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. 

Image may contain: food

खर्रा याणारे कोणत्याही ठिकाणी गेले की खर्रा कुठे मिळेल भाऊ असे विचारतात. मग त्यासाठी वाढीव किंमतही मोजायला तयार असतात. तंबाखू खाल्याने कॅन्सरसारखा आजार होतो हे माहित असतानाही खाणाऱ्यांची कमी नाही. खऱ्याच्या किमती गगणाला भिडल्या असल्या तरी खर्राशौकीन मात्र "शौक बडी चीज है' म्हणत खर्रा चघळतच आहेत.

सध्या 120चा खर्रा तब्बल 50 रुपये, मजा खर्रा 30 रुपयांचा झाला आहे. खरे तर आरोग्यासाठी हितकर पण महाग म्हणविल्या जाणाऱ्या काजू, किसमिस, बदामसारख्या पौष्टिक ड्रायफ्रूट्‌सपेक्षाही खर्रा महाग असला तरी त्याची मागणी मात्र वाढतच आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात खर्रा खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कधीकाळी दोन, पाच रुपयांना मिळणारा खर्रा नंतर दोन आकडी संख्येपर्यंत पोहोचला. आता त्याने अर्धशतक गाठले आहे. खऱ्याची किंमत चक्क 50 रुपये झाली आहे. गंमत म्हणजे काजू 100 रुपयांत 100 ग्रॅम मिळतो, बदाम 90 रुपयांत 100 ग्राम तर किसमिस अवघ्या 35 रुपयांत 100 ग्रॅम मिळते.

खर्रा जेमतेम 50 ग्रॅम वजनाचाही नसतो, तरी तो चढ्या दराने विकला जात आहे. चांगले आरोग्यदायक ड्रायफ्रूट्‌स सोडून कॅन्सरला आमंत्रण देणारा खर्रा खाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यात खर्रा शौकीनांचे खिसे हलके होत आहेत. पण, हा "नाद खुळा' सुटायचे नाव घेत नाही. 

खर्रा, गुटखा या आरोग्यास अतिशय हानिकारक पदार्थांवर जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. सरकार व अनेक सामाजिक संस्था यासंदर्भात जनजागृती करीत आहेत. पण, अद्याप खर्रा, गुटख्यासारख्या व्यसनांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे खऱ्यापेक्षा काजू खा ना अशी विनंती करण्याची वेळ आली आहे. 

No photo description available.
ग्राहकांना अशाप्रकारे खर्रा दिला जातो 

महिला, मुलांची संख्या वाढली 
पूर्वी खर्रा, गुटखा खाणे पुरुषांची मक्‍तेदारी मानली जात होती. पण, आता महिला आणि मुलेही या व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. अनेक शेतांमध्ये धानाची रोवणी, निंदणी, कापणीच्या वेळेस खऱ्याच्या पन्या विखुरलेल्या दिसून येतात. शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही खऱ्याकडे वळताना दिसत आहेत. यासंदर्भात गंभीर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. 

शौकीनांची संख्या वाढतेय 
नुकतीच पानठेला चालक-मालक संघटनेची बैठक पार पडली. यात 20 रुपयांचा मजा खर्रा 30 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय 120 नावाने ओळखला जाणारा विशेष तंबाखू मिसळलेला खर्रा 50 रुपयांत विकण्याचे ठरविण्यात आले. अनेक पानठेल्यांवर नवे दरपत्रक लागले आहेत. परंतु, पानठेल्यावर येणाऱ्या शौकीनांची संख्या घटण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. 

Image may contain: one or more people

खर्रा खाण्याची चढाओढ 
गडचिरोली जिल्हा पूर्णत: उद्योगविहीन आहे. येथे गरिबीचे प्रमाण मोठे आहे. तरीही अधिकारी, कर्मचारी, मध्यमवर्गापासून मजुरांपर्यंत खर्रा खाण्याची चढाओढ दिसून येते. मजुरांची संख्या यात जास्तच आहे. याशिवाय महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थीही खऱ्याच्या आहारी जाताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी खर्ऱ्याची किंमत पाच रुपये होती. त्यानंतर 10 रुपये, 15 रुपये आणि 20 रुपयांपर्यंत पोहोचली. आता त्याच्याही पुढे मजल गेली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eat nuts than real!