दीड लाख शिक्षकांचेच प्रशिक्षण!

मंगेश गोमासे
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नागपूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) राज्यातील पाच लाख शिक्षकांनी वर्षभरात विविध विषयांचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात यंदाही केवळ दीड लाखावर शिक्षकांना प्रत्यक्षात प्रशिक्षण दिल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

नागपूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) राज्यातील पाच लाख शिक्षकांनी वर्षभरात विविध विषयांचे प्रशिक्षण घेतल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात यंदाही केवळ दीड लाखावर शिक्षकांना प्रत्यक्षात प्रशिक्षण दिल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात शिक्षकांच्या प्रशिक्षणाचाही समावेश केला जातो. यूडाईजच्या आकडेवारीनुसार राज्यात 1 लाख 4 हजार 971 प्राथमिक शाळा तर 25 हजार 737 माध्यमिक शाळा आहेत. यात 6 लाख 66 हजार प्राथमिक तर माध्यमिकमध्ये 3 लाख 61 हजार शिक्षकांचा समावेश आहे. प्रशिक्षणाच्या नियमानुसार एका शाळेतील एकच शिक्षकाचा प्रशिक्षणात समावेश केला जातो. मग शाळांचा एकूण आकडा पाच लाखावर नसताना, एका वर्षात पाच लाख शिक्षकांना विद्या प्राधिकरणाने कसे प्रशिक्षण दिले हे कोडे आहे. विद्या प्राधिकरणाकडून खोटी आकडेवारी देऊन कांगावा केला जात असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.
विद्या प्राधिकरणाचे कामकाज
प्रशिक्षणाचे सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडूनच राबविण्यात येते. या सर्वच शाळांतील शिक्षकांना प्रामुख्याने भाषा, विज्ञान, गणित, संगणक, परीक्षा पद्धती, मूल्यमापन चाचण्या, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. कोणत्या विषयांचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, याबाबतची माहिती अर्जाच्या स्वरूपात शिक्षकांकडून मागविण्यात येते. त्यानंतर विषयानुसार टप्प्याटप्प्याने वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. विविध विषयांच्या तज्ज्ञांकडून शिक्षकांना प्रशिक्षणाचे धडे देण्यात येतात. प्रशिक्षणाला येणाऱ्या शिक्षकांची जेवण्याची व राहण्याची व्यवस्थाही प्रशिक्षणाच्या ठिकाणीच असते.
राज्यात शाळांच्या तुलनेत विद्या प्राधिकरणाने दिलेली आकडेवारी खोटी आहे. याउलट तेवढे शिक्षक प्रशिक्षणाला गेलेच नाही. सरसकट आकडेवारी धरण्याची या विभागाला सवय असल्याने आकडे फुगल्याचे दिसते.
रवींद्र फडणवीस, राज्य सहकार्यवाह, महाराष्ट्र शाळा संस्थाचालक महामंडळ

Web Title: education news in nagpur