संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे! कोरोना संक्रमणात वधारला अंड्याचा भाव

सुरेंद्र चापोरकर | Monday, 21 September 2020

कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात कोंबडी व अंड्यांमुळे संसर्ग वाढतो, अशा अफवांनी बाजार गरम झाल्याने व्यवसाय प्रभावित होऊन पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले होते

अमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतीकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. ही शक्ती कशाकशाने वाढते याची यादीही आहे. नागरिक ती यादी फॉलो करू लागले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा जिन्नस म्हणजे अंडी. आणि बहुतेकांचा आवडताही. अंडी प्रेमी ती विविध प्रकारे खातात. कधी बॉईल करून. कधी आॅमलेट'करून. कधी अंडा भुर्जी तर कधी अंडा करी. आता डॉक्‍टरांनीच दररोज एकवेळ तरी अंडी खा, असा सल्ला दिल्याने खवैय्यांचे चांगलेच फावले. मात्र परिणामी बाजारात अंडी महागली. त्याचा लाभ उत्पादकांना कमी व विक्रेत्यांना अधिक होतो आहे.

कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात कोंबडी व अंड्यांमुळे संसर्ग वाढतो, अशा अफवांनी बाजार गरम झाल्याने व्यवसाय प्रभावित होऊन पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले होते. तथापि, पोल्ट्री व्यावसायिक व शासनाने वारंवार आवाहन करूनही ग्राहक काही फिरकत नव्हता. संक्रमणाच्या प्रारंभी विशेषतः लॉकडाउनच्या कालावधीत या व्यवसायाला उतरती कळा लागली होती. अफवांसोबत बाजारपेठा बंद राहण्याचाही परिणाम या व्यवसायावर झाला.

सध्या कोरोना संक्रमणाची गती वाढली आहे. दररोज शेकडोंच्या संख्येत संक्रमित रुग्ण आढळू लागले आहेत. उपचारादरम्यान संक्रमित रुग्णांना आहाराकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला जात असून प्रतीकारशक्ती वाढण्यासाठी दररोज एकतरी अंडे खाण्यावर भर दिला जात आहे. याचा अंडेविक्रीच्या व्यवसायावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या व्यवसायातील मंदी हटून अंडी विक्रीला सुगीचे दिवस आले आहेत. पाच रुपयांना मिळणारे एक अंडे आता दोन रुपयांनी वधारले असून सात रुपये प्रती नग मिळू लागले आहे. बंद पडलेली अंडीविक्रेत्यांची दुकाने अनलॉकमधील मिशन बिगीन अगेनमध्ये सुरू झालीत.

मागणी वाढली
अनलॉकमध्ये व्यवसाय मुक्त होण्यासोबतच अंडी खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या जात असल्याने त्याचा बराच परिणाम विक्रीवर झाला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून मागणीत वाढ झाली आहे. कालपर्यंत ग्राहकांची असलेली प्रतीक्षा संपली आहे, असे थोक विक्रेता प्रहेस ठाकूर यांनी सांगितले.

नुकसान टळले
अफवांमुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. प्रारंभी अंडी विकायची कुठे? असा प्रश्‍न होता. कोंबड्यांच्या देखभालीचा खर्च सहन करावा लागला. आता बाजारातून मागणी येऊ लागली आहे. व्यवसायाचे चक्र नियमित झाले, असे पोल्ट्री व्यावसायिक सुरेशसिंग ठाकूर यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ विरोधासाठी विरोध; काँग्रेसचे आश्वासन मोदी सरकारनेच पूर्ण केले

शरीराची झीज भरण्यासाठी उपयुक्त
आजारात दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे व आजारामुळे होणारी झीज तातडीने भरून काढण्यासोबतच रोगप्रतीकारशक्ती वाढण्यासाठी अंडी उपयुक्त आहेत. अंडी हा संपूर्ण आहार असून त्यामध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स, प्रोटिन्स, फायबर आहेत. जी शरीर साधारणतः तयार करू शकत नाही ती अंड्यांतून मिळतात. त्यामुळे सेवन करणे योग्य आहे, असा सल्ला डॉ. विक्रम वसू यांनी दिला.

संपादन - स्वाती हुद्दार