vidhan Sabha 2019 :  विदर्भात आठ लाखांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईत अमरावती, यवतमाळ आणि  चंद्रपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी आठ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

नागपूर - निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईत अमरावती, यवतमाळ आणि  चंद्रपूर जिल्ह्यात दोन ठिकाणी आठ लाखांची रोकड जप्त करण्यात आली.  वाहनाची तपासणी करताना मारेगाव आणि सिंदेवाही तालुक्‍यात ही रोकड जप्त केली.

कुंभा (यवतमाळ) - यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा (ता. मारेगाव) पॉइंटवर एक लाख दोन हजार रुपयांची रोकड कारमधून जप्त करण्यात आली. मारेगाव येथील पोलिस व महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाने काल शनिवारी (ता.५) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नाकाबंदी सुरू असताना ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, कुठेही अवैध दारू व पैशांचा पुरवठा होऊ नये, यासाठी मारेगाव तालुक्‍यातील अंतिम टोकावर असलेल्या कोसारा येथे वाहनांची तपासणी करण्यासाठी नाका देण्यात आली आहे. निवडणूक विभाग व पोलिस प्रशासनाच्या वतीने तालुक्‍यातील कोसारा येथे नाकाबंदी लावण्यात आली. दरम्यान, काल शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आय २० कारने (क्रमांक एम. एच. २१-व्ही ९८७९) हसन रजा शेख हे माजरी येथून मारेगावला येताना कोसारा पॉइंटवर त्याच्या वाहनाची तपासणी केली असता, त्याच्याजवळ एक लाख दोन हजार रुपयांची रोकड आढळून आली. मारेगावचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेळके, वरठे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने  ही कारवाई केली.

सिंदेवाही(चंद्रपूर) - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी एसएसटी पथकाच्या माध्यमातून सुरू आहे. रविवारी (ता. ६)साडेअकरा वाजताच्या सुमारास  एका वाहनातून एक लाख दहा हजारांची रोकड जप्त करण्यात आली. सिंदेवाही शहरातील शिवाजी चौकात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थिर पथकाने नाकेबंदी करून वाहनाची तपासणी सुरू केली आहे. सिंदेवाहीकडून एक चार वाहन जात होते. हे वाहन एसएसटी पथकप्रमुख चौधरी, पोलिस स्टेशनचे धारणे, कपिल भोयर यांनी अडविले. त्यानंतर वाहनाची तपासणी सुरू केली. वाहनात १ लाख १० हजार रुपये आढळून आले. सध्या चौकशी सुरू आहे.

अमरावती - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात फिरते पथक व विविध यंत्रणांद्वारे काटेकोर तपासणी करण्यात येत असून, अचलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तपास नाक्‍यावर रामअधर सीताराम गौर यांच्याकडून ६ लाख ७३ हजार ७७० रुपयांची रोख रक्कम  जप्त करण्यात आली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सजग असून कुठलाही अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाने सूचित केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight lakh cash seized in Vidarbha