हृदयद्रावक घटना! आठ महिन्यांची गर्भवती गेली रुग्णालयातून पळून; भूमकाजवळ गेली असता झाला अंत

Sakal | Friday, 19 June 2020

संभाव्य धोका पाहून डॉक्‍टरांनी गर्भवतीला सिझेरीन करण्याचा सल्ला दिला. मात्र, घाबरलेल्या गर्भवतीने चक्‍क कुटुंबासह रुग्णालयातून पळ काढला. गर्भवतीचे समूपदेशन करण्यासाठी गेलेल्या डॉक्‍टरला गाकवऱ्यांनी मारहाण केली.

पथ्रोट (जि. अमरावती) : पथ्रोट पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या बोराळा येथील गर्भवती प्रसूतीसाठी अचलपूर येथील रुग्णालयात भरती झाली. मात्र, तिला श्‍वसनाचा त्रास होता. यामुळे डॉक्‍टरांनी तिची तपासणी केली. यानंतर संभाव्य धोका पाहून डॉक्‍टरांनी गर्भवतीला सिझेरीन करण्याचा सल्ला दिला. मात्र, घाबरलेल्या गर्भवतीने चक्‍क कुटुंबासह रुग्णालयातून पळ काढला. गर्भवतीचे समूपदेशन करण्यासाठी गेलेल्या डॉक्‍टरला गाकवऱ्यांनी मारहाण केली. यानंतर जो घटनाक्रम घडला तो पुढीलप्रमाणे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराळा येथील रहिवाशी मंगली सुभाष भुसूम (वय 20) ही महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. तिला त्रास होत असल्याने 16 जून रोजी प्रसूतीसाठी अचलपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयात भरती केल्यानंतर तिला श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. यामुळे डॉक्‍टरांनी तपासणी केली. तपासणी केल्यानंतर डॉक्‍टरांनी गर्भवती व तिच्या कुटुंबीयांना अमरावती येथे सिझेरीन करण्यासाई रेफर करण्याचे सांगितले.

संबंधित बातमी : भयंकर! भुमकाने आठ महिन्याच्या बाळाला दिले गरम सळीचे चटके

परंतु, डॉक्‍टरांचे काहीही न ऐकता गर्भवतीसह कुटुंबीयांनी रात्री नऊ वाजता गावाला पळ काढला. याची माहिती मिळताच दुसऱ्या दिवशी सलोना आरोग्य केंद्रामधील डॉक्‍टरांच्या चमूने तिचे समूपदेशन केले. तरीही तिने डॉक्‍टरांचे काहीही ऐकले नाही. उलट डॉ. विशाल दाभाडे यांना मारहाण करण्यात केली. यानंतर डॉक्‍टरांचा चमू झोन सर्वेसाठी दुसऱ्या ठिकाणी निघून गेले.

भूमकामुळे गेला गर्भवतीचा जीव

रुग्णालयातून पळ काढणारी गर्भवतीला अचानक त्रास सुरू झाला. यामुळे ती उपचारासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत पायविहीर येथील भूमकाकडे (जादूटोणा) गेली. भुमकाने गर्भवतीवर अघोरी उपचार करण्यास सुरुवात केली. येथे योग्य उपचार होईल असे तिला व कुटुंबीयांना वाटत होते. मात्र, गुरुवारी (ता. 18) सकाळी साडेतीन वाजताच्या सुमारास गर्भवतीचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा : सकाळी शेतात गेलेले राजेंद्र सायंकाळ झाली तरी घरी परतले नाही, कुटुंबीय शेतात गेले असता...

डॉक्‍टरांनाच केली मारहाण

आठ महिन्यांची गर्भवती रुग्णालयात पळून गेल्याची माहिती समजताच डॉक्‍टरांचा एक चमू तिची समजूत काढण्यासाठी गावी पोहोचला. उपस्थित डॉक्‍टरांनी गर्भवतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संभाव्य धोका पाहताच सिझेरीन करावे लागेल असे समजावून सांगितले. मात्र, गर्भवती व तिचे कुटुंबीय काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी डॉक्‍टरांना स्पष्ट शब्दात नकार दिला. तसेच डॉक्‍टरांनाच मारहाण केली. यानंतर डॉक्‍टरांचा चमू घटनास्थळावरून निघून गेला. डॉक्‍टर विशाल दाभाडे यांनी पालिस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.

सदस्यांनी केली मारहाण

गर्भवतीचे समूपदेशन करण्यासाठी आम्ही तिच्याकडे गेलो होते. तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मला मारहाण केली. त्यामुळे मी पथ्रोट पोलिस ठाण्यात तशी तक्रार नोंदविली आहे.
डॉ. विशाल दाभाडे,
सलोना प्राथमिक आरोग्य केंद्र