समितीसमोर खडसे यांचे घुमजाव? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती डी. झोटिंग समितीसमोर बुधवारी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची साडेतीन तास उलटतपासणी झाली. भोसरी येथील जमीन व्यवहारबाबत कोणतीही माहिती नसल्याची साक्ष खडसे यांनी यावेळी दिली. यापूर्वी हा व्यवहार योग्य असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता 27 ला पुन्हा समितीसमोर त्यांची साक्ष होणार आहे. 

महसूलमंत्री असताना पदाचा गैरवापर करून भोसरी येथील जमीन नातेवाइकांना दिल्याचा आरोप खडसेंवर आहे. या आरोपाच्या चौकशीकरिता 23 जून 2016 ला न्यायमूर्ती डी. झोटिंग समिती गठित करण्यात आली. गेल्या आठ महिन्यांत समितीने महसूल व उद्योग, एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व कागदपत्रांची तपासणीही केली. या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उलट चौकशीही केली. साक्ष देण्यासाठी खडसे प्रत्यक्ष समितीसमोर हजर झाले. जमीन खासगी असल्याचे शपथपत्र खडसेंनी समितीला दिल्याची माहिती खडसेंचे वकील ऍड. एम. जी. भांगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर भोसरीच्या जमीन व्यवहारप्रकरणाची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याची साक्ष खडसेंनी समितीसमोर दिल्याचे एमआयडीसीचे वकील ऍड. चंद्रशेखर जलतारे यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले. जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची बाब अधिकाऱ्यांनी लपविल्याचा खुलासा त्यांनी समितीसमोर केला. त्याचप्रमाणे जमिनीच्या व्यवहाराबाबत माहिती सात, आठ जूनला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खडसेंनी राजीनामा 3 जूनला दिल्याने त्यांना त्यानंतर कशी माहिती मिळाली, मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे कारण त्यांना माहीत नाही का? असा उलट सवाल एमआयडीसीचे वकील जलतारे यांनी उपस्थित केला. 4 कोटींचा व्यवहार घरातील व्यक्तींकडून होतो आणि त्यांना माहिती नसल्याच्या उत्तरावरही त्यांनी आक्षेप घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्तिवादाच्या वेळी खडसे अनेक प्रश्‍नांवर गोंधळले. समितीला त्यांच्याकडून काही प्रश्‍नांचा खुलासा होणे अपेक्षित आहे. खडसेंना काम असल्याने त्यांनी तारीख देण्याची विनंती केली. आता साक्ष नोंदविण्यासाठी खडसे 27 फेब्रुवारीला समितीसमोर हजर होणार आहेत. या संदर्भात खडसेंनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले. 

Web Title: eknath khadse bhosari land issue