निवडणुकीत व्हावा बॅलेट पेपरचा वापर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

नागपूर - चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपर किंवा व्हीव्हीपॅट सुविधा असलेल्या ईव्हीएमने घेण्यात यावी अशा विनंतीसह तीन मतदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने राज्य शासन आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावत 6 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. 

याचिकाकर्त्यांमध्ये पुष्पा नगरकर, राज सारीडेक व सुरेश कांबळे यांचा समावेश आहे. येत्या 19 एप्रिल रोजी महानगरपालिकेची निवडणूक आहे. सर्वोच्च न्यायालयाने डॉ. सुब्रमण्यम स्वामी वि. भारतीय निवडणूक आयोग प्रकरणात 8 ऑक्‍टोबर 2013 रोजी दिलेल्या निर्णयानुसार, निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट सुविधा असलेल्या ईव्हीएम वापरणे आवश्‍यक आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. व्हीव्हीपॅट सुविधा असलेल्या ईव्हीएम उपलब्ध नसल्यास बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 

याचिकेमध्ये नगरविकास विभागाचे सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. अंजन डे व ऍड. अपूर्व डे यांनी बाजू मांडली. 

Web Title: Election ballot papers to be used