गोंदिया, तिरोड्यात प्रचाराचा धडाका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

गोंदिया : गोंदिया व तिरोडा नगर परिषदेची निवडणूक येत्या 8 जानेवारीला होत आहे. शुक्रवारी (ता. 30) निवडणूक चिन्हांच्या वाटपानंतर अपक्ष उमेदवारांनीही प्रचाराचा श्रीगणेशा केला. दिवसभर वाहनांच्या धुराड्यात प्रचार केल्यानंतर, अपक्षांसह राजकीय पक्षांचे उमेदवार रात्री घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये सध्या निवडणुकीचीच चर्चा होताना दिसते. 

नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने 9 डिसेंबरपासून सुरू झाला. 9 ते 17 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच निवडणूक प्रचाराला सुरवात केली. परंतु, नजरा लागल्या होत्या त्या 29 डिसेंबरकडेच. हा दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा होता. या दिवशी गोंदियातून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या 18 उमेदवारांनी तर, सदस्यपदासाठी अर्ज करणाऱ्या 50 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तिरोड्यात 76 जणांनी सदस्यपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 4 जणांनी माघार घेतली. नगराध्यक्षपदाकरिता 9 जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने आठ उमेदवार रिंगणात आहेत. तथापि, निवडणूक रिंगणातील अपक्ष उमेदवारांना काल, शुक्रवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत हातावर हात ठेवून असलेल्या अपक्ष उमेदवारांनी चिन्हांचे वाटप होताच निवडणूक प्रचाराला गती दिली आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रचाराचे वाहन या गल्लीतून त्या गल्लीत कानठळ्या बसवित फिरत आहेत. उमेदवारांनी प्रचाराची आखणी एवढ्यावरच थांबविली नाही तर, व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातूनही केली आहे. पक्षाच्या प्रस्थापित उमेदवारांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा अपक्ष उमेदवार मांडत आहेत. त्यामुळे आणखीनच मतदारांचे मनोरंजन होत आहे. 

थंडीत वातावरण गरम 
गेल्या तीन दिवसांपासून वातावरणाचा पारा कमालीचा घसरला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत थंडी हुडहुडी भरत आहे. यात प्रचाराने मात्र, निवडणुकीचे वातावरण गरम केले आहे. रात्री दरवाजा बंद असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन उमेदवार मतांचा जोगवा मागत आहेत. काहींकडून पार्टीचा बेतही आखला जात आहे.

Web Title: Election campaign starts in Gondia