अकाेला : निवडणूकीच्या तोंडावर भरारी पथकाने पकडले 53 लाख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

  • अकोल्यात भरारी पथकाची धडक कारवाई
  • निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाखोंची प्रलोभने
  • वाशीम बायपास परिसरात​ कारवाई

अकाेला : अकोला लोकसभा मतदार संघातील अकाेला पश्चिम विधानसभा मतदान संघ कार्यक्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या स्थिर पथकाने दाेन वेगवेगळ्या कारवाया करुन 52 लाख 86 हजार 200 रुपयांची रक्कम पकडली. संबंधित रक्कम पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आली असून, दाेन्ही प्रकरणांचा तपास पाेलिस करत आहेत.

निवडणुकीत पैशांचा उपयाेग करुन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम राजकीय पक्षांचे प्रतिनिधी करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात बैठे व भरारी पथक गठित करण्यात आले आहेत. या पथकांपैकी एका बैठा पथकाने वाशीम बायपास परिसरात साेमवारी तपासणी अभियान राबविले. यावेळी पथकाला कार क्रमांक एम. एच. - 3 जी-8468 मध्ये 50 लाख रुपये आढळून आले. या गाडीमध्ये वाहकासाेबत गोविंद सुमंत मुळे (रा. मालेगाव) उपस्थित हाेते. सदर रोख रक्कम एचडीएफसी बॅंक अकोला येथून 25 लाख रुपयांच्या दाेन विड्रॉलमध्ये काढल्याचे समजते. गोविंद एजन्सी मालेगाव येथील योगेश श्यामसुंदर मुदंडा यांच्या नावाने ही रक्कम काढल्याचा दावा मुंदडा यांनी केला आहे. संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या मालकीची असल्याचे व एचडीएफसी बँकेतून काढलेल्या रक्कमेचे स्टेटमेंट हरीश श्यामसूंदर मुंदडा यांनी जुने शहर पाेलिस ठाण्यात सादर केले आहे.

पावणे तीन लाख जप्त -
लोकसभा निवडणुकसाठी तयार करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने साेमवारी दुपारी वाशीम बायपास चौकात दुसरी कारवाई करून लाल रंगाची कार पकडली. पथकाने कारची तपासणी केली असता कारमध्ये दाेन लाख 86 हजार 200 रुपयांची बॅग आढळून आली. संबंधित रक्कम सुरेंद्र चौथराम केसवाणी यांची असल्याचे चाैकशी दरम्यान समोर आले असून, ही रक्कम मजुरीची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी पथक प्रमुख संतोष काजळे यांनी जुने शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून, पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Election Commission squad caught 53 lakhs in Akola

टॅग्स