पहिल्या फेरीचा निकाल 40 मिनिटांमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 October 2019

नागपूर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होऊ घातली आहे. जिल्ह्यातील बाराही मतदार संघांची मतमोजणी सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार आहे. पहिल्या फेरीचा निकाल 40 मिनिटांमध्ये अपेक्षित असून पूर्व आणि पश्‍चिम नागपूरचा निकाल सर्वप्रथम येण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक मतदारसंघांतून पाच केंद्रांची निवड करून तेथील व्हीव्हीपॅट स्विपची गणना केली जाणार आहे. 

नागपूर : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होऊ घातली आहे. जिल्ह्यातील बाराही मतदार संघांची मतमोजणी सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार आहे. पहिल्या फेरीचा निकाल 40 मिनिटांमध्ये अपेक्षित असून पूर्व आणि पश्‍चिम नागपूरचा निकाल सर्वप्रथम येण्याची अपेक्षा आहे. प्रत्येक मतदारसंघांतून पाच केंद्रांची निवड करून तेथील व्हीव्हीपॅट स्विपची गणना केली जाणार आहे. 
सोमवारी आटोपलेली मतदान प्रक्रिया आणि गुरुवारी होऊ घातलेली मतमोजणी या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली. मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम स्ट्रॉंगरूमपर्यंत पोहोचण्याचा क्रम पहाटेपर्यंत सुरू होता. निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीत संपूर्ण यंत्रणा सीलबंद करण्यात आली असून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. आता मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे "रॅन्डमायजेशन' करून बुधवारी त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रारंभ होईल. पहिल्या फेरीचा निकाल यायला काहीसा उशीर झाला तरी नंतरच्या फेऱ्यांना गती येईल. पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल आल्याशिवाय पुढच्या फेरीला सुरुवात होणार नाही. निकालाची आकडेवारी "सुविधा' ऍप्लिकेशनवर वेळोवेळी अपलोड केली जाणार आहे. मतमोजणीनंतर प्रत्येक मतदारसंघातून पाच मतदान केंद्रांची ईश्‍वरचिठ्ठीने निवड केली जाईल. तेथील व्हीव्हीपॅट यंत्रातील स्लिपची गणना करून आकडे सारखे असल्याची शहानिशा करून घेतली जाईल. मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर संपूर्ण शहरातील ईव्हीएम कळमना मार्केटमध्ये तर अन्य मतदार संघातील यंत्रणा नियोजित ठिकाणी ठेवले जाईल. 45 दिवस यंत्र सुरक्षित ठेवले जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 
मोबाईलवर प्रतिबंध 
केवळ निवडणूक अधिकारी व सहायकांनाच मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेण्याची परवानगी असेल. अन्य कर्मचारी, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना मोबाईल आता नेता येणार नाही. 
स्ट्रॉंगरूमला अभेद्य सुरक्षाकडे 
स्ट्रॉंगरूमभोवती अभेद्य सुरक्षाकडे तयार करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी "परिंदाभी पैर नही मार सकता' अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था आहे. सर्वप्रथम केंद्रीय सुरक्षा दलांतील जवानांची नियुक्ती आहे. त्यानंतर राज्य राखीव पोलिस दलाची तैनाती असून बाहेर स्थानिक पोलिस नियुक्त आहेत. प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्हीद्वारे वॉच राहणार आहे. स्ट्रॉंगरूमपासून मोजणीच्या ठिकाणी ईव्हीएम नेण्याच्या मार्गावरसुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी अखंडित वीजपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. यंदा जास्त काळजी घेण्यात आली असून एकदाही वीजपुरवठा खंडित होऊ नये याची पुरेपूर तसदी घेण्यात येत आहे. स्ट्रॉंगरूम परिसरात जॅमर लावण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. पण, मुळात हा आक्षेपच चुकीचा आहे. दुसरे यासंदर्भात निर्णयाचे सर्व अधिकार निवडणूक आयोगालाच आहे. यामुळे जिल्हा प्रशासन निर्णय घेऊ शकत नसल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी स्पष्ट केले. 
52 यंत्रे आणि 216 व्हीव्हीपॅट बदलले 
प्रत्यक्ष मतदानादरम्यान नागपूर जिल्ह्यात 29 बॅलेट युनिट, 23 कंट्रोल युनिट व 216 व्हीव्हीपॅट बदलावे लागले. तक्रार येताच तातडीने दखल घेऊन अल्पावधीत ते बदलून मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. तत्पूर्वी मॉकपोलदरम्यान 22 बॅलेट युनिट, 39 कंट्रोल युनिट आणि 70 व्हीव्हीपॅट बदलावे लागले. त्याही पूर्वी उमेदवारांच्या क्रमानुसार "सेटिंग' करताना बिघाड आल्याने 39 बॅलेट युनिट, 102 कंट्रोल युनिट आणि 211 व्हीव्हीपॅट बदलावे लागले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election, counting, First round results in 40 minutes