सोशल मीडियावर "बाहुबली' तर यश पायदळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

नागपूर : कुठलीही निवडणूक प्रचार, प्रचारसभा व त्यावरील अवाढव्य खर्चाशिवाय होत नाही, असा गेली अनेक वर्षे असलेला समज आता सोशल मीडियामुळे कमी होण्याची चिन्हे दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांत सोशल मीडिया वापरकर्त्यांत दुपटीने वाढ झाली असून सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास निवडणुकीत प्रचारासाठीच्या खर्चात 80 टक्‍क्‍यांनी घट होण्याची शक्‍यता सोशल मीडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली.

पुढे विधानसभा निवडणूक असून आतापासून काही उमेदवारांनी तयारी सुरू केली. विधानसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा वापर होईल. मात्र, त्याचा योग्य वापर केल्यास उमेदवारांना प्रचारावरील खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करणे शक्‍य असल्याचे पारसे यांनी नमूद केले. प्रचारसभा, रॅलीसाठी मोठ्या नेत्यांना बोलावणे, त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्चासह वाहनांचा ताफा, मोठा शामियाना, साऊंड सिस्टिम, कार्यकर्त्यांना देण्यात येणारी रसद, प्रचार साहित्य यावर उमेदवारांचा होणारा खर्च कोट्यवधींचा असून तो टाळता येईल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील नवसारी लोकसभा मतदार क्षेत्रातून सात लाख मतांनी निवडून आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी कुठलीही प्रचारसभा, रॅली न काढता केवळ सोशल मीडियावरून जनतेशी थेट संवादातून यश मिळविले. त्यातुलनेत मोठ्या प्रचारसभा घेऊनही अनेकजण तोंडघशी पडले. सद्यस्थितीत भारतीय सोशल मीडिया वापरकर्त्यांचा 29 टक्के वेळ "ऑन स्क्रिन टाईम' खर्च होत असून केवळ मनोरंजन म्हणून पुढे आलेला सोशल मीडिया आता 100 टक्के संवादाचे माध्यम ठरत आहे. सोशल मीडिया संवेदना आदान-प्रदान करण्याचे मुख्य व्यासपीठ आहे. सोशल मीडियाकडे मात्र अद्यापही कानाडोळा करण्यात येत आहे. 2014 च्या निवडणुकीत ज्या पक्षांनी सोशल मीडियाच्या ताकदीकडे कानाडोळा केला, त्यांना नंतर पश्‍चातापाची वेळ आलेली सर्वांनीच बघितली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात अपयश आल्याने निवडणुकीतही यश आले नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा पूर्ण ताकदीने वापर करणाऱ्यांना पुढील निवडणुकीत खर्च वाचविण्याची संधी असल्याचे पारसे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election news