कन्हान, हिंगण्यात सभापतींची निवड बिनविरोध

  हिंगणा ः राष्ट्रवादीचे नेते रमेशचंद्र बंग यांच्यासोबत सर्व सभापती व इतर.
हिंगणा ः राष्ट्रवादीचे नेते रमेशचंद्र बंग यांच्यासोबत सर्व सभापती व इतर.

नागपूरः कन्हान नगर परिषद व हिंगणा नगरपंचायतच्या विषय समित्यांवरील सभापतींची निवडणूक गुरुवारी बिनविरोध पार पडली. विषय समित्यांवर कन्हानमध्ये भाजपचे तर हिंगण्यात राष्ट्रवादींचे वर्चस्व दिसून आले. सभापतींची निवड झाल्यानंतर हर्षोल्हासात नवनियुक्‍त सभापतींचे अभिनंदन करण्यात आले.

वानाडोंगरी: सात महिन्यांपासून रिक्त असलेल्या हिंगणा नगरपंचायतच्या सभापतिपदांची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. यात राष्ट्रवादीचे चारही सभापती बिनविरोध विजयी झाले. उपाध्यक्ष या नात्याने पाणीपुरवठा सभापती हे पद भाजपकडे नियमानुसार गेले. गुरुवारी झालेल्या निवडणुकीचे नागपूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी सूरज वाघमारे हे पिठासीन अधिकारी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये बांधकाम सभापतिपदावर गुणवंता चामाटे, शिक्षण व क्रीडा सभापती पदावर ललित चौधरी, महिला व बालकल्याण सभापती पदावर बेबी चिव्हाणे व स्वच्छता व आरोग्य सभापतिपदावर भावना युवराज पुंड या बिनविरोध निवडून आल्या. नियमानुसार हिंगणा नगरपंचायतच्या उपाध्यक्ष हेमलता देशमुख यांच्याकडे पाणीपुरवठा सभापतिपदांची जबाबदारी सोपविण्यात आली. याप्रसंगी हिंगणा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. रुचा धाबर्डे उपस्थित होत्या. सर्वप्रथम झालेल्या हिंगणा नगरपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अकरा व भाजपचे सहाच नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रवादीच्या अकरा नगरसेवकांचा गट हा अधिकृतपणे नोंदणी करण्यात आला होता. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपद जरी भाजपकडे असले तरी सभापतिपदासाठी आजही बहुमत हे राष्ट्रवादीकडे असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. विजयानंतर चारही सभापतींनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांची भेट घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष मिनाक्षी ढोले, युवानेते आशीष पुंड, युवराज पुंड व उमाजी चामाटे उपस्थित होते.  
एकही अर्ज न आल्याने बिनविरोध
कन्हान : नगर परिषद कन्हान-पिपरीच्या विषय समितीची निवडणूक बिनविरोध होऊन स्थायी समितीच्या सभापतिपदी चहांदे, बांधकाम समितीच्या सभापतिपदी डॉ. पाठक, स्वच्छता समिती सभापतिपदी काठोके, पाणीपुरवठा समिती सभापतिपदी कुरडकर, शिक्षण/महिला समितीच्या सभापतिपदी खोब्रागडे यांची निवड झाली. गुरुवारी (ता.8) नगर परिषद कन्हान-पिपरी येथे निवडणूक अधिकारी जगदीश काटकर, मुख्याधिकारी सतीश गांवडे यांच्या उपस्थितीत नगर परिषद कार्यालयात विषय समितीची निवडणूक घेण्यात आली. यात स्थायी समितीकरिता पदसिद्ध अध्यक्ष शंकर चहांदे, बांधकाम सभापतीकरिता डॉ. मनोहर पाठक, स्वच्छता सभापती गेंदलाल काठोके, पाणीपुरवठा सभापती मनोज कुरडकर, शिक्षण व महिला बालकल्याण सभापती संगीता खोब्रागडे आणि स्थायी समिती सदस्य म्हणून नितू गजभिये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विरोधात एकही अर्ज न आल्याने निवड बिनविरोध घोषित केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com