नागपुरात धावणार इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी रस्त्यांवर धावणार आहेत. मोदी सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्त 26 मे रोजी या इलेक्‍ट्रिक टॅक्‍सीचा प्रारंभ होणार आहे. इलेक्‍ट्रिक ट्रॅक्‍सीचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा नागपूर महापालिकेतर्फे केला जात आहे.

गडकरी यांचा 61 वा वाढदिवस येत्या 27 मे रोजी मोठ्या धूमधडाक्‍यात नागपुरात साजरा होणार आहे. या दिवशी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर सत्कार समारंभ होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आदी उपस्थित राहणार आहेत.

वाढदिवसानिमित्त गडकरी यांच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून नागपूरकरांना पुन्हा एक भेट मिळणार आहे. नागपूरच्या रस्त्यावर जवळपास 200 इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी उतरणार आहे. "महिंद्र अँड महिंद्र' या कंपनीने या टॅक्‍सी तयार केल्या आहेत. या इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी प्रदूषणविरहित असून पेट्रोल-डिझेलवर होणाऱ्या खर्चात यामुळे बचत होणार आहे. प्रवासी टॅक्‍सी चालविणाऱ्या ओला कॅब नागपूर महापालिकेच्या साहाय्याने या इलेक्‍ट्रिक टॅक्‍सी चालविणार आहे. मोदी सरकारला येत्या 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण होणार आहे.

Web Title: electric taxi in nagpur city