लॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

नागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक श्रेणीत आणून सवलतीत वीजपुरवठा करणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट चार ते पाच रुपयांपर्यंत दिलासा मिळणार आहे. लॉंड्री व्यावसायिकांना कमी दराने वीजपुरवठा करावा म्हणून परिट (धोबी) समाजाने मागणी केली होती. त्यावर सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील दहा लाख व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे. 

लॉंड्री, तसेच कपड्यांना प्रेस करणारे व्यावसायिक संघटित नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला औद्योगिक व्यवसाय म्हणून गणले जात नव्हते. त्यांच्या व्यवसायाचा वीजदर हा व्यावसायिक दरानुसार लागू होता. यामुळे घरगुती व्यवसाय करणारे लॉंड्री व प्रेस व्यावसायिक वीजबिल भरता-भरता त्रस्त झाले होते. त्यांना प्रतियुनिट दहा रुपयांपेक्षा अधिक दराने वीजबिल भरावे लागत होते. तसेच, 300 पेक्षा अधिक युनिट झाले, तर त्याचे वाढीव दर अधिक असायचे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि वीजबिलच अधिक भरावे लागत असल्याने संसाराचा गाडा चालविताना व्यावसायिकांना प्रचंड त्रास होत होता. 

यासंदर्भात महाराष्ट्र धोबी समाज महासंघाचे (सर्व भाषक) संस्थापक अध्यक्ष डी. डी. सोनटक्‍के यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शिष्टमंडळासह भेट घेतली होती. तसेच, लॉंड्री व्यवसाय मोडकळीस येईल, अशी भीतीही त्यांच्याजवळ व्यक्‍त केली होती. परिट समाजासह इतर समाजही लॉंड्री व्यवसायात उतरले आहेत. याची जाणीवही सोनटक्‍के यांनी ऊर्जामंत्र्यांना करून दिली होती. बावनकुळे यांनी यावर मंत्रालयात चर्चा करून औद्योगिक श्रेणीत या व्यवसायाला समाविष्ट केले, तसेच वीजदरात सवलत देण्याचे परिपत्रक नुकतेच काढले आहे. आता लॉंड्री व्यावसायिकांना फक्‍त सहा रुपये युनिटप्रमाणे वीजबिल येणार आहे. तसेच त्याला मर्यादा ठेवली नाही. राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांनी बावनकुळे यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील दहा लाख लॉंड्री व्यावसायिकांना लाभ मिळणार आहे. तसेच, या व्यवसायाला औद्योगिक श्रेणीत समाविष्ट केल्यामुळे या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांची भर पडणार आहे. तसेच कौशल्य विकाससारख्या योजनांचाही लाभ होणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्‍य झाले आहे. 
- डी. डी. सोनटक्‍के, अध्यक्ष, महाराष्ट्र धोबी समाज महासंघ (सर्व भाषक) 

10 लाख -  राज्यातील लॉंड्री व्यावसायिक 
10 रुपये प्रतियुनिट  - सध्याचा वीजबिलाचा दर 

Web Title: Electricity at cheapest rates to the laundry professionals