चार वर्षांत ४५६ जणांना ‘शॉक’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

नागपूर - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत विजेचा धक्का लागून ४५६ जणांना जीव गमवावा लागला. २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले. वर्षाला पीक जळण्याच्या सरासरी ३०० घटना घडत आहेत. नुकसानभरपाईचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे.

नागपूर - जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत विजेचा धक्का लागून ४५६ जणांना जीव गमवावा लागला. २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले. वर्षाला पीक जळण्याच्या सरासरी ३०० घटना घडत आहेत. नुकसानभरपाईचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे.

विजेच्या वाढत्या असुरक्षित वापरामुळे व पुरेशी सुरक्षा न बाळगल्याने हे अपघात घडले. तर, २७९ प्राण्यांना वीजवाहिनीच्या तीव्र धक्‍क्‍याने जीव गमवावा लागला. शहरात ११ ते १७ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात विविध ठिकाणी विजेच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती करण्यात येते. महावितरणचे विजेचे खांब, तारा, केबल, मीटर, बटण असे अनेक प्रकारचे जीर्ण साहित्य तसेच ग्राहकांकडून होणारा वीजसाधनांचा चुकीचा वापर यामुळे विजेचा धक्का लागण्याचे प्रमाण वाढत आहे. वादळ-वाऱ्यामुळे तुटलेल्या तारांचे धक्के बसून अनेकांना जिवाला मुकावे लागले. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वर्षाला सरासरी ४० ते ६० जणांचा मृत्यू होत आहे. ३० ते ४० जण जखमी होत आहेत. मृत्यू झाल्यास अथवा पीक जळल्यास नुकसानभरपाई देण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यासाठी खास स्वतंत्र विद्युत निरीक्षक विभाग आहे. घटना घडल्यानंतर या विभागातील अधिकारी, कर्मचारी पंचनामा करतात. या विभागाच्या पंचनाम्यानुसार बहुतांश अपघात महावितरणच्या चुकांमुळे होत आहेत, असे स्पष्ट होते.

घरगुती अपघात घडण्याचे प्रमाण काहीसे कमी आहे. यात लोकांची चुकीची हाताळणी कारणीभूत असल्याचे समोर आले. धक्का लागून मृत्यू झाल्यास अथवा पीक जळल्यास नुकसानभरपाई दिली जाते; पण यासाठीची प्रक्रिया क्‍लिष्ट आहे. विद्युत निरीक्षक विभाग व पोलिसांचा पंचनामा, महावितरणाचा अहवाल अशा अनेक कागदपत्रांच्या जंजाळातून मदत मिळेपर्यंत अनेक वर्षे जातात. 

अपघात टाळण्यासाठी 
वीजतारांखाली गोठा, शेतमाल, चारा ठेवू नये. वीजवाहिन्यांना अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या परस्पर तोडू नये. फांद्यांचा अडथळा होत असल्यास महावितरणला कळवावे. शेतीला तारेचे कुंपण करून वीजप्रवाह सोडू नये. ते व्यक्तीच्या तसेच वन्यजीवांच्या जिवावर बेतते. घरांतील विद्युत उपकरणे लहान मुलांना हाताळू देऊ नये. उपकरणे उंचीवर ठेवावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नका. रोहित्रातील फ्यूज परस्पर टाकू नये.

विजेचा अपघात टाळण्यासाठी सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे. घरगुती कूलर आणि शेतातील पंपाद्वारे विजेचा धक्का लागण्याच्या घटना जास्त असल्याचे अहवालात समोर आले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ईएलसीबी) बसविल्यास ८० टक्के मृत्यूच्या घटना टाळता येतील. 
- विनय नागदेव, अधीक्षक अभियंता, ऊर्जा व कामगार विभाग, नागपूर

विजेमुळे झालेले मृत्यू  
वर्ष             मानवी      प्राणी 

२०१५-१६       ६३            ७५ 
२०१६- १७      ७१            ७४ 
२०१७-१८       ७४           ८०
२०१८-१९      ४८            ५० 

Web Title: electricity current