एम्प्रेस सिटीची बत्ती गुल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

एम्प्रेस सिटीची बत्ती गुल
नागपूर : अग्निशमन यंत्रणा नसलेल्या बहुमजली इमारतींचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याच्या मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार एसएनडीएलच्या पथकाने रविवारी दुपारी एम्प्रेस सिटीतील रहिवासी इमारतींत कारवाई केली. कारवाईला विरोध केल्याने रहिवासी व वीज कर्मचाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगले. स्थानिकांचा रोष लक्षात घेता साडेसहा वाजता वीजपुरवठा सुरळीत केला.

अग्निशमन यंत्रणा नसलेल्या अनेक बहुमजली इमारतीतील नागरिक धोका पत्करून वास्तव्यास आहेत. संबंधित इमारतींना अग्निशमन विभागाकडून वेळोवेळी नोटीस बजावण्यात आली. मात्र, दखलच घेतली जात नसल्याने वीज व पाणी कापण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसएनडीएलचे पथक रविवारी दुपारी 1.45 वाजताच्या सुमारास एम्प्रेस मॉल परिसरात दाखल झाले. परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या एचटी रूमचे स्वीच बंद करून सिल लावले. यामुळे 2.15 वाजतापासून फ्लॅटचा वीजपुरवठा खंडित झाला अन्‌ रहिवाशांची तारांबळ उडाली. कारवाईला विरोध दर्शवित एसएनडीएलच्या पथकाला घेराव घातला. साडेचार तास कर्मचारी रहिवाशांच्या विळख्यात होते. त्यांच्यात सायंकाळी सहापर्यंत वाकयुद्ध रंगलेले दिसून आले. दुसरीकडे अग्निशमन विभागाचे अधिकारीच काय मनपा आयुक्तांकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सायंकाळी 6.30 वाजता वीजपुरवठा पूर्ववत केला.
782 धोकादायक बहुमजली इमारती
उपराजधानीत अग्निशमन यंत्रणा नसलेल्या 782 हून अधिक धोकादायक इमारती आहेत. 372 इमारतींनी अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याने कारवाईचे आदेश दिले आहे. त्यातील 17 इमारतींचा वीजपुरवठा 15 दिवसांमध्ये खंडित करण्याचे आदेश असून, 10 इमारती एसएनडीएलच्या हद्दीतील आहेत. परंतु, संबंधित इमारतींना वीजखंडित करण्यापूर्वीची नोटीस अद्याप मिळाली नसल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला आहे.
एम्प्रेस मॉल जनरेटरवरच
एम्प्रेस मॉलचा वीजपुरवठा यापूर्वीच खंडित केला आहे. तेव्हापासून महाकाय जनरेटरवरच इथली यंत्रणा सुरू आहे. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असल्याचे वीज क्षेत्राशी संबंधितांचे म्हणणे आहे.

Web Title: electricity cut empress mall

टॅग्स