३० सरपंचांच्या राजीनाम्यानंतरही विजेची समस्या ‘जैसे थे’

३० सरपंचांच्या राजीनाम्यानंतरही विजेची समस्या ‘जैसे थे’

कोरची (जि. गडचिरोली) : वीज ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. परंतु, एकीकडे विकासाच्या मोठमोठ्या बाता केल्या जात असताना कोरची तालुक्यात अद्यापही स्थानिकांना विजेसाठी संघर्ष करावा लागतोय. एरवी दररोज ये-जा करणारी वीज कधी कधी तब्बल दोन-दोन दिवस नसते. त्यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिमेस छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त कोरची तालुक्यात वीजप्रश्न कायमचा सुटावा म्हणून तालुका निर्मितीपासून अनेकदा सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले.

तालुका विकास आंदोलन समितीने मोर्चे, चक्काजाम आंदोलन, तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सामूहिक राजीनामे दिले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. असे एक ना अनेकवेळा आंदोलन करूनही वीज वितरण कंपनीने अद्याप तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत केलेला नाही. तालुक्याला मिळणारी वीज घनदाट जंगलातून येत असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे कारण सांगितले जाते. समस्येचे मूळ काय, हे माहिती असताना एकच प्रश्न वर्षानुवर्षांपासून रेंगाळत असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय हा प्रश्न पडतो. विजेअभावी नागरिकांची कामे खोळंबतात. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न तातडीने सोडवावा.

३० सरपंचांच्या राजीनाम्यानंतरही विजेची समस्या ‘जैसे थे’
अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक

मागील वर्षी ४ ऑगस्ट २०२० रोजी सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीने झंकार गोंदी फाट्यावर चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व केले. विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री, ऊर्जामंत्री यांच्याशी बोलणी करून कोरची तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री एकनाथ शिंदे, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्यासोबत सर्वपक्षीय विकास आंदोलन समितीचे पदाधिकारी, क्षेत्राचे आमदार यांच्यासमक्ष वरिष्ठांनी तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या; परंतु वर्ष लोटूनही समस्या कायम आहे.

९० गावांत अंधेरा कायम रहे!

कुरखेडा, कोरचीहून आणला जाणारा विद्युत पुरवठा घनदाट जंगलातून येत असल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे ऊर्जामंत्री व मुख्य अभियंता यांनी गोंदिया जिल्ह्यातून येत असलेल्या सब सेंटरच्या सर्व अधिकाऱ्यांना कोरचीचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. परंतु गोंदिया जिल्ह्यातील अधिकारी गडचिरोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना जुमानत नाही. त्यामुळे वीज पुरवठा वाट्टेल तेव्हा सुरू आणि वाट्टेल तेव्हा बंद करतात. त्यामुळे कोरची तालुक्यातील ९० गावांतील नागरिकांना दोन दोन दिवस विजेविना काढावे लागतात.

३० सरपंचांच्या राजीनाम्यानंतरही विजेची समस्या ‘जैसे थे’
७६ वर्षीय पांडुरंगांची अशीही भक्ती; सायकलने वैष्णोदेवीचा प्रवास
कोरची तालुक्यात कुरखेडा व चिचगडवरून ३३ केव्ही सब सेंटरला विद्युत पुरवठा होतो. पण, विजेची लाईन घनदाट जंगलातून असल्याने ट्री कटिंग करण्याच्या नावावर दरवर्षी लाखो रुपये याच कामावर खर्च झाल्याचे दाखवून अधिकारी आपली पोळी शेकून घेतात. परंतु मूळ समस्या जैसे थे राहते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या कित्त्येक वर्षांपासून कायम आहे. कुरखेडा व चिचगडला येणारा वीजपुवठा एरियल केबल बंचने जोडून केल्यास ट्री कटिंगवर दरवर्षी होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचेल. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने एरियल केबलने जोडणी करावी.
- मनोज अग्रवाल, जिल्हा महासचिव राष्ट्रीय काँग्रेस, तथा नगरसेवक नगरपंचायत कोरची
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तालुक्यातील सरपंचांनी वेळोवेळी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले . परंतु आदिवासीबहुल तालुक्याकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होते. आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने शासनाला विनंती करतो की, शासन आमची समस्या सोडविण्यासाठी गंभीर नसेल, आमच्या समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळ नसेल तर नागरिकांची कामे करणारे कार्यक्षम सरपंच म्हणून काम करण्याची आमची मानसिकता नाही. शासनाने कोरची तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्काळ प्रयत्न करावे. अन्यथा सरपंच संघटना राजीनामा देऊन शासनाचा निषेध नोंदवल्याशिवाय राहणार नाही.
- धनिराम हिळामी, अध्यक्ष, सरपंच संघटना, तालुका कोरची

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com