वीज कर्मचाऱ्यांचा दररोज मृत्यूशी सामना

नागपूर : रामा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देहली वीजवाहिनीवरील डिस्क बदलताना वीजकर्मचारी.
नागपूर : रामा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देहली वीजवाहिनीवरील डिस्क बदलताना वीजकर्मचारी.

नागपूर : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैंनिकांप्रमाणेच वीज कर्मचारीसुद्धा प्राणाची बाजी लावीत लढवय्याप्रमाणे काम करतो. दररोजच विजेशी त्याचा सामना शूर लढवय्याप्रमाणे सुरू असतो. पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी महायुद्धापेक्षा कमी नाही. वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरू शकते. कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. या बाबी विचारात घेऊन वीज कर्मचाऱ्यांवर दोषारोपण करणे टाळावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सर्वत्र आधुनिकीकरणाच्या दिशेने काम सुरू असले तरी वीजवाहिन्याची यंत्रणा सुरू अथवा बंद करण्यासाठी आजही मनुष्यबळाची गरज आहे. वीजवाहिनीत अकस्मात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास वीज उपकेंद्रातील कर्मचारी नजिकच्या उपकेंद्रासोबत संपर्क साधून तेथील वीजपुरवठ्याची स्थिती जाणून घेतात. वीजपुरवठा सुरळीत झाल्याची योग्य शहानिशा केल्यानंतरच वीजवाहिनीचा वीजपुरवठा सुरू केला जातो. वाहिनी बंद असल्यास संबंधित वाहिनी नादुरुस्त म्हणून जाहीर केली जाते. वाहिनीत झालेला बिघाड शोधणेदेखील एकप्रकारे तारेवरची कसरत असते. पाऊस आणि अंधाराची पर्वा न करता शोधमोहीम राबविली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व वीज खांबांची तपासणी करावी लागते तर कधी काही खांबांदरम्यान बिघाड सापडतो. हे सर्व करीत असताना लागणारा वेळ बघता ग्राहकांनीही महावितरणची अडचण समजून घ्यावी.
नागपुरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वीजवितरण वाहिन्यांची मोठ्या प्रमाणात क्षती झाली आहे. खोदकामात तुटलेले केबल जोडले गेली असली तरी अनेकदा जोड असलेल्या भागात पाणी साचल्याने केबल नादुरुस्त होऊन वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो. अशावेळी हा बिघाड नेमका कुठे झाला हे शोधून काढणे जिकरीचे काम असतानाही वादळवाऱ्याची तमा न बाळगता वीजकर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही ग्राहकाला वीज मिळावी यासाठी झटतो. वीजपुरवठा खंडित होताच अनेकदा ग्राहक संबंधित जनमित्र किंवा अभियंत्याला फोन करणे सुरू करतात. मात्र अशावेळी फोनवर बोलण्याऐवजी वीजपुरवठा सुरळित करायला त्याचे प्राधान्य असल्याने तो फोन घेण्यास असमर्थ असतो. ही बाब लक्षात घेत ग्राहकांनी महावितरणच्या नि:शुल्क कॉलसेंटरला किंवा मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com