कर्जमुक्तीसाठीची आधारलिंकची अडचण दूर

Farmer Adharlink.jpg
Farmer Adharlink.jpg

अकोला : कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील एक लाख 13 हजार 580 शेतकऱ्यांपैकी 18 हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे बँक खाते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आधार लिंक नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात कर्जमुक्तीची योजना अडचणीत सापडली होती. परंतु, अवघ्या दोन आठवड्याच या अडचणीवर प्रशासनाने मात केली असून, शुक्रवारपर्यंत (ता.24) केवळ 1374 शेतकऱ्यांचे बँक खात्यासोबत आधार लिंक करणे बाकी होते.

‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेंतर्गत नमुद निकष, अटीनुसार प्रथमदर्शनी जिल्ह्यातील एक लाख 13 हजार 580 शेतकरी कर्जमुक्ती’साठी पात्र ठरले होते. या पैकी जिल्हा सेवा सहकारी संस्थेचे 52 हजार 688 शेतकऱ्यांचे 350 कोटी तर, शेतकऱ्यांना कर्ज वितरीत केलेल्या राष्ट्रीयकृत व खासगी, अशा 24 बँकेच्या 61 हजार 892 कर्जधारक शेतकऱ्यांना 425 कोटी रुपयांच्या कर्ज माफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली होती. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी मात्र, पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाद्वारे विविध स्तरावर आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या लावल्या. त्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याची मोहिम राबविली आणि दोन आठवड्यातच 18 हजार शेतकऱ्यांपैकी 16 हजार 626 शेतकऱ्यांचे खाते लिंक करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी कळविले.

उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरीत बँकखाते आधारलिंक करावे
1 फेब्रुवारीला पोर्टल सुरू होईल. बँका त्यावर 1 ते 15 फेब्रुवारी पर्यंत त्यांच्या खातेदार शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करतील. त्यानंतर 22 ते 23 तारखेला पहिली यादी जाहीर होऊ शकते. या यादीतील आयडी नंबर घेऊन शेतकऱ्यांनी आधार केंद्रावर जाऊन आधार ऑथेंटिकेशन करावे. या ठिकाणी माहिती योग्य असल्यास निदर्शनास आल्यानंतर, संबंधित शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. परंतु, त्यापूर्वी पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक असून, अजूनही 1374 शेतकऱ्यांचे खाते लिंक होणे बाकी आहे. या शेतकऱ्यांनी त्वरीत त्यांचे बँक खाते आधार लिंक करावे.
- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com