जिल्हा परिषदेतील नोकरभरतीत गैरव्यवहार

Employment corruption in Zilla Parishad
Employment corruption in Zilla Parishad

भंडारा : जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीदरम्यान घेतलेल्या लेखी परीक्षेत ओएमआर (ऑप्टिकल मार्क रिकग्नेशन) शीटमध्ये हेराफेरी करून गुण वाढवून गैरव्यवहार केला. प्रकरणी भंडारा पोलिसांनी चार उमेदवारांसह एसएमबी एजन्सीच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. लेखी परीक्षेत सहभागी 19 अधिकारी, कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी होणार असल्याने यात मोठे रॅकेट गुंतले असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अंगणवाडी पर्यवेक्षक व कनिष्ठ अभियंता (पाणीपुरवठा) या पदांसाठी नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत होती. 12 जानेवारीला झालेल्या लेखी परीक्षेनंतर ओएमआर शीटमध्ये हेराफेरी करून गुण वाढविण्याचा प्रकार घडला. हा प्रकार उघडकीस येताच जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी लक्ष घालून पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी चार उमेदवारांसह एसएमबी प्रा. लिमिटेड एजन्सीचे कर्मचारी सागर उंबरकर, पवार, शुभम राऊत व अन्य एकावर गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत. प्रकरणी पोलिस सखोल तपास करणार असल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भरती प्रक्रियेत सहभागी जिल्हा परिषद व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. ओएमआर शीटमध्ये हेराफेरी करून गुण वाढविण्याचा प्रकार घडला असून यात एजन्सीचे कर्मचारी सहभागी आहेत. मात्र, भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही संशयाची सुई जात आहे. यामुळे सखोल चौकशीअंती मोठे मासे गळाला लागण्याची शक्‍यता आहे.

आरोपींच्या अटकेनंतर फुटणार बिंग

एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर यात दोषी असणाऱ्यांचे बिंग फुटणार आहे. यामुळे गैरव्यवहारात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. उमेदवारांची सखोल चौकशी केल्यास कुणाच्या माध्यमातून सदर प्रकार केला, याचाही खुलासा होणार असल्याने सर्वांचे लक्ष चौकशीकडे लागले आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. दोषींना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. सदर एजन्सीने यापूर्वी घेतलेल्या परीक्षांसह परीक्षेत सहभागी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.

- अरविंद साळवे

जिल्हा पोलिस अधीक्षक

जिल्हा परिषदेच्या भरतीतील घोळ ही निंदणीय बाब आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. या गैरप्रकारात सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी. यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.

- रमेश डोंगरे

अध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com