दीड हजार कोटींतून विदर्भातील वीजयंत्रणेचे सक्षमीकरण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाने वर्षभरात दमदार कामगिरी करीत अनेक आघाड्यांवर यश संपादित केले. विदर्भातील वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 470 कोटींचे विविध प्रकल्प सुरू आहेत. 

नागपूर - महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाने वर्षभरात दमदार कामगिरी करीत अनेक आघाड्यांवर यश संपादित केले. विदर्भातील वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 470 कोटींचे विविध प्रकल्प सुरू आहेत. 

नागपूर परिक्षेत्राची वितरण हानी आर्थिक 2016-17 मध्ये 14.6 टक्के होती. ती 2017-18 मध्ये 1.1 टक्‍क्‍याने कमी होऊन 13.5 टक्के झाली. वीजपुरवठ्यात 2.8 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून कृषी वीज वापरात 1.7 टक्के आणि गैरकृषी वीज वापरात 3.6 टक्‍यांनी वाढ झाली आहे. सोबतच उच्चदाब वीजविक्रीत 7.3 टक्‍क्‍यांनी घसघसीत वाढ झाली आहे. लघुदाब घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील वीजबिलापोटी वसुलीची कार्यक्षमता मागील आर्थिक वर्षाच्या 98.59 टक्‍क्‍यांच्या तुलनेत 3.22 टक्‍क्‍यांनी वाढून 101.81 टक्के झाली. सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या वीजबिल वसुली कार्यक्षमतेतही भरीव वाढ झाली आहे. 

डिसेंबर 2017 ते मार्च 2018 दरम्यान विदर्भात तब्बल 80 हजार 540 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. 1 लाख 35 हजार 31 जुने व नादुरुस्त मीटर बदलण्यात आले. रोहित्र बिघाडाचे प्रमाण 10.6 टक्‍क्‍यांवरून 7.2 टक्‍क्‍यांवर आणण्यात यश आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे महावितरण कर्मचाऱ्यांशी संबंधित मागील वर्षात 22 प्रकरणांची नोंद झाली होती, तर 2017-18 मध्ये 4 प्रकरणेच नोंदविली गेली. ग्राहकांच्या तक्रारींच्या जलद निराकरणासाठी प्रादेशिक संचालक कार्यालयाने helpdeskrdnagpur@gmail.com हे हेल्पडेस्क सुरू केले आहे. प्रादेशिक संचालक स्वत: या ई-मेलवर येणाऱ्या तक्रारींची योग्य दखल घेणार आहेत. ग्राहकांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास ग्राहकांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिला आहे. 

प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. वर्षभरात अनेक कामे मार्गी लागली आहेत. महावितरण ही ग्राहकसेवेप्रति पूर्णपणे समर्पित कंपनी आहे. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यानेही आपली ग्राहकसेवेप्रति असलेली भूमिका बजावताना महावितरणची प्रतिमा कुठेही मलिन होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. 
-भालचंद्र खंडाईत,  प्रादेशिक संचालक, महावितरण 

वर्षभरातील ठळक बाबी 
वर्षभरात वितरण हानीत 1.1 टक्‍क्‍याने कमी 
थकबाकीत मोठ्या प्रमाणात घट 
माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग 
भ्रष्टाचारावर नियंत्रण 
पारदर्शक ग्राहकसेवेला प्राधान्य 
विदर्भातील 90 टक्के ग्राहकांना मोबाईलवर सेवा 
उद्योगांना वीजबिलात 588 कोटींची सबसीडी 
कृषी ग्राहकांना 24,569 नवीन वीजजोडण्या 
उद्योगांच्या तक्रारी सोडविण्यासाठी नागपुरात हेल्पडेस्क 

Web Title: Empowerment of power control in Vidarbha